रस्ता रुंदीकरणात शाखा तुटली; पण मोडला नाही कणा!

ठाणे: पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले, पण ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभे राहिलेल्या शिवसैनिकांची जिद्द तशीच कायम आहे, याचे उदाहरण कळव्यात पुन्हा एकदा समोर आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली कळवा नाक्यावरील शिवसेना शाखा रस्तारुंदीकरणात जमिनदोस्त झाली. त्यानंतर कंटेनरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात उभारलेली शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली. अशावेळी खचून न जाता येथील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांनी स्वखर्चाने भाड्याच्या जागेत नव्याने शाखा उभारली आहे. भाड्याच्या जागेत ही शाखा असली तरी ती सध्या शिंदे गटाच्या कंटेनर शाखेला तगडे आव्हान देत आहे.

शिवसेनेत फूट पडून सत्तांतरण झाले. ठाणेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्षभर ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली त्या शहर आणि परिसरात शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांमध्ये टोकाचे संघर्ष, राडे पहायला मिळाले. ही धग अजूनही अधूनमधून जाणवत असते. यावर मध्यममार्ग म्हणून शिंदे गटाने कंटेनर शाखांचा आधार घेतला आहे. पण त्याचवेळी हातातून निसटलेल्या शाखांच्या ‘पुर्नबांधणी’चा संकल्प ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यापैकीच एक शाखा म्हणजे कळवा येथील शिवसेना शाखा होय.

कळवा नाक्यावरील शिवसेना शाखा म्हणजे येथील रहिवाशांसाठी हक्काचे ठिकाण. शाळेच्या दाखल्यापासून रुग्णालयसेवेपर्यंत अनेकांना आधार या शाखेने दिला होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शाखेचे उद्घाटन केल्यामुळे शिवसैनिकांसाठी ते मंदिराहून कमी नव्हते. पण काही वर्षांपूर्वी ही शाखा रस्तारुंदीकरणात बाधित झाली.
बाधित झालेल्या ठिकाणी शिवसैनिकांनी पुन्हा शाखा बांधण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी न झाल्याने अखेर कंटेनरमध्ये शाखा चालवण्यात आली. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर एके दिवशी शिंदे गटाने शाखेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर लावून शाखा ताब्यात घेतली. यावेळी दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा झाला. यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना माघार घ्यावी लागली. पण हरकत नाही, पुन्हा नव्याने शाखा उभारू असा संकल्पही यावेळी सोडण्यात आला.

जिथे कंटेनर शाखा आहे, त्यापासून हाकेच्या अंतरावर घड्याळ चौकात ठाकरे गटाचे विभागप्रमुख नंदकुमार पाटील आणि सहा शाखाप्रमुखांनी जागा भाड्याने घेऊन पुन्हा शाखा उभारली आहे. त्यासाठी दर महिना भाडे स्वखर्चाने भरत आहेत. यामध्ये शिवसैनिकही ५०रुपयांपासून शक्य होईल तेवढा हातभार लावत आहेत.

जुन्या दिवसांची आठवण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा गल्ली तिथे शाखा हा नारा दिला तेव्हा शेकडो शिवसैनिकांनी पदरमोड करत शाखा उभारल्या होत्या. अनेकांनी आपल्या बायकोचे दागिनेही मोडले होते. आता बहूतेक शाखांचा नूर पालटला आहे. अनेक पदाधिकारी नगरसेवक ते मंत्री बनले. त्यामुळे पुन्हा पदरमोड करण्याची वेळ शाखाप्रमुखांवर क्वचितच ओढावली. पण आता परिस्थिती प्रतिकूल असली तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक मागे हटणार नाही, असे ठाकरे गटाचे कळवा विभागप्रमुख नंदकुमार पाटील यांनी सांगितले.