वरप येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
कल्याण : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्यासह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कल्याण तालुक्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण विभागातर्फे येत्या रविवारी वरप येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर कल्याण तालुक्यात अजित पवार पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
येत्या रविवारी 7 जानेवारी रोजी कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, भरत गंगोत्री, सोनिया धामी, किसन तारमळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे आणि पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी दिली.