अख्खी ठाणे महापालिका उतरणार हाती झाडू घेऊन

३० डिसेंबरपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची (डीप क्लिन मोहीम) सुरूवात शनिवार, ३० डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम २४ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार, महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात ही मोहिम राबविण्यात येईल. या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबविली जाईल. शनिवार, ३० डिसेंबर २०२३ रोजी पहिली प्रभाग समिती आणि शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ नववी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबविण्यात येईल. शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचे आयोजन मोठ्या स्वरुपात असेल. त्यादिवशी इतर प्रभाग समिती मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करेल. उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

मोहिमेत रस्ते, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, रस्ते दुभाजक – मिडियन, फूटपाथ, फूटपाथ लगतच्या भिंती, तलाव, मैदाने, उद्याने, सार्वजनिक शौचालये, रेड स्पॉट, मार्केट आणि परिसर, बस स्टॉप, नाले, उघडी गटारे, रस्त्यावरील नाम आणि दिशादर्शक फलक, डी पी बॉक्स आणि परिसर, महत्त्वाची ठिकाणे, पुतळे, स्मारके, उड्डाणपूल आणि पूलांखालील जागा, सार्वजनिक वहिवाटीच्या सर्व जागा यांची साफसफाई करण्यात येईल. तसेच, सार्वजनिक शौचालयांच्या सफाईसह परिसर, शौचालयाकडे येणारा रस्ताही स्वच्छ केला जाईल. त्याचबरोबर, बेवारस वाहने हटवणे, अनधिकृत फलक, बोर्ड, होर्डिंग, लोंबकळणाऱ्या वायर्स काढणे आणि धूर फवारणी करणे यांचाही या मोहिमेत समावेश आहे. मलवाहिन्या, चेंबर ओव्हरफ्लो होत असतील तर त्यांची सफाईही केली जाईल. रस्ते साफ करताना कचरा, धूळ, माती, डेब्रिज हटविण्यात यावे. रस्ते दुभाजक, कर्बस्टोन यांची सफाई करताना आवश्यकतेनुसार त्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे.

प्रभाग समितीत निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्षेत्रात संबंधित विभागांचे कर्मचारी त्यांच्या त्यांच्या अखत्यारितील कामे करतील. घनकचरा विभाग, मलनि:सारण विभाग, उद्यान विभाग, पर्यावरण विभाग, विद्युत विभाग त्यांना नेमून दिलेली कामे सुविहितपणे पूर्ण करतील.

अतिरिक्त मनुष्यबळाचे आवश्यकतेनुसार नियोजन करण्याची जबाबदारी नोडल ऑफिसर यांची राहील. घनकचरा विभागाचा त्या प्रभाग समितीचा १०० टक्के कर्मचारी वर्ग संबंधित प्रभाग समितीत कार्यरत राहील. तसेच, इतर सर्व प्रभाग समितींमधील प्रत्येकी किमान ५० टक्के कर्मचारी वर्ग हाही त्या प्रभाग समितीत कार्यरत राहील. स्वत:च्या प्रभाग समितीत केवळ अत्यावश्यक कामेच त्या दिवशी केली जातील. उद्यान, तलाव, अतिक्रमण, मलनि:सारण विभाग यांचे १०० टक्के कर्मचारी, तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जास्तीत जास्त कर्मचारी, साफसफाईचे सर्व ठिकाणचे मनुष्यबळ हे याच मोहिमेसाठी कार्यरत राहील.

अतिरिक्त आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभाग समितीतील कामांचे नियोजन करण्यात येईल. तर, उपायुक्त दर्जाचा अधिकारी या कामांसाठी नोडल ऑफिसर म्हणून काम करेल. त्यांना सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांचे सक्रिय सहकार्य असेल. प्रत्येक विभागाचा सगळा कर्मचारी वर्ग हा शनिवारच्या दिवशी संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे नियोजन असलेल्या प्रभाग समितीत कार्यरत राहील. याला आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि अग्निशमन दल या अत्यावश्यक सेवांचा अपवाद राहील, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, सोसायट्या, नागरी कल्याण समिती, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त श्री. बांगर यांनी केले आहे.