मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
अंबरनाथ: सीसी रस्त्यांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती अशा वेगाने विकसित होणाऱ्या अंबरनाथ शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि अंबरनाथ शिवसेनेतर्फे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आयोजित केलेल्या स्ट्रीट फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त ग्वाही दिली. पूर्वी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती असताना शहरात सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून युपीएससी सेंटर तयार आहे, त्यामुळे अंबरनाथ शहर विकासाचे रोल मॉडेल आहे. यापुढे विकास कामांसाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
विकास कामांबरोबरच नागरिकांच्या मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची देखील तितकीच गरज आहे. अंबरनाथ शिवमंदिर फेस्टिवलमुळे शहराची ओळख जागतिक स्तरावर गेली आहे याचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या अडीच वर्षात राज्य तिसऱ्या क्रमांकावर गेले होते, पण युतीच्या काळात राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीखही जाहीर झाली आहे, राम मंदिराच्या उभारणीवरून केल्या जाणाऱ्या टिकेवर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
बी- केबिन परिसरात सोमवार 25 रोजी झालेल्या स्ट्रीट फेस्टिवलमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते. शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, एकात्मिक घनकचरा प्रकल्प आदी कामांसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच ही कामे सुरू होतील अशी माहिती खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी स्वागत केले.