स्ट्रीट फेस्टिवलला अभूतपूर्व गर्दी: मुख्यमंत्र्यांकडून उपक्रमाचे कौतुक

अंबरनाथ: वाहनांच्या गर्दीत हरवलेला बी-केबिनचा रस्ता स्ट्रीट फेस्टिव्हलमुळे रसिकांच्या अभूतपूर्व गर्दीने फुलून गेला होता. 40 स्टेजवर विविध कलाकारांच्या कलागुणांमुळे फेस्टिवलची रंगत वाढत गेली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्ट्रीट फेस्टिवलच्या उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि अंबरनाथ शिवसेनेतर्फे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सोमवार 25 डिसेंम्बर रोजी बी केबिन रस्त्यावरील निसर्ग ग्रीन परिसरात स्ट्रीट फेस्टिवल आयोजित केला होता.

रस्त्याच्या एका बाजूला विविध कलाविष्कार सादर करणाऱ्यांसाठी 35 स्टेजची व्यवस्था करण्यात आली होती. रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने कलाकारांनी कला सादर केली.

भारतीय नृत्य प्रकारांबरोबर आंतरराष्ट्रीय नृत्य प्रकार, मराठ मोळी लावणी, योगा, मल्लखांब, दोरीवरील आसने, जादूचे खेळ, करओके संगीत, स्पॉट पेंटिंग, यांच्यासह मुस्तफा अझिज नाझा यांच्या कव्वालीच्या ठेक्यांवर तरुणाईने ठेका धरत साथ संगत केली, चढता सूरज धिरे, धिरे, बजरंगी भाईजान, तेरे लशके कमरसारख्या कव्वाली ऐकून नागरिक तल्लीन झाले होते.

रस्त्याच्या एका बाजूला कलावंतांसाठी स्टेज तर दुसऱ्या बाजूला फेस्टिवलमधते येणाऱ्या नागरिकांसाठी चटपटीत पदार्थांची सोय करण्यात आली होती. काही बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. सायंकाळी 7 ला सुरू झालेला फेस्टिवल रात्री 12 पर्यंत सुरू होता. नागरिकांना वाहनांच्या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून निसर्ग-ग्रीन परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फेस्टिवलला भेट दिली होती. शहरप्रमुख वाळेकर यांनी मुख्यमंत्री यांच्यासह खासदार डॉ. शिंदे यांचे स्वागत केले.

रसिकांचा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी फेस्टिवलची व्याप्ती वाढवण्याची संकल्पना मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. माजी नगराध्यक्ष विजय पवार, गुलाबराव करंजुले, प्रज्ञा बनसोडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, निखील वाळेकर, मिलिंद गान, अरविंद मालुसरे, नीता परदेशी, पद्माकर दिघे, महेश वाळुंज आदी पदाधिकारी उपस्थित होते.