राजेश जागरे/शहापूर
शिक्षणाचा बऱ्यापैकी परीस स्पर्श लाभलेल्या शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची सध्याची अवस्था दयनीय असून शहापुरातील 457 जिल्हा परिषदेच्या शाळांना 1269 शिक्षक मान्य असले तरी आज घडीला 1108 शिक्षक कार्यरत आहेत. तब्बल 161 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यातील 457 शाळांमध्ये 21,779 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या 457 शाळांपैकी 115 शाळांमध्ये 8, 10, 12 म्हणजे 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. इक शिक्षकी शाळा 52 आहेत. पर्यायाने शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने पालक आपल्या मुलांचे प्रवेश शहरी भागातील खाजगी शाळांमध्ये घेतात. भविष्यात पट संख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शंभरच्यावर शाळा कायमच्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे भीतीदायक वास्तव दिसत आहे.
ज्या शाळांमध्ये कमी शिक्षक आहेत, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 20 पटसंख्येच्या आतील शाळांमधील शिक्षक पाठवून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली जाते. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केलेली असून पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली.
शाळा आणि शिक्षकांची संख्या
★ एकुण शाळा: 457
★एक शिक्षकी शाळा: 52
★20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा: 115
★मंजुर शिक्षक: 1269
★कार्यरत शिक्षक: 1108
★रिक्त शिक्षक संख्या:161
विद्यार्थ्यांची संख्या
पहिली: 3441 विद्यार्थी
दुसरी: 3772 विद्यार्थी
तिसरी: 4,057 विद्यार्थी
चौथी: 3,669 विद्यार्थी
पाचवी: 2,381 विद्यार्थी
सहावी: 1,564 विद्यार्थी
सातवी: 1,555 विद्यार्थी
आठवी: 536 विद्यार्थी
एकूण 20, 975 विद्यार्थी
शाळा आहे,विद्यार्थीही आहेत मात्र शिक्षक गायब
तालुक्यातील डोळखांब केंद्रांतर्गत असलेल्या हिंगळुद जिल्हा परिषदेच्या शाळेत 13 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेवर भिवंडी येथून शिक्षकाचा दोन महिन्यापूर्वी बदली आदेश निघाला असून तो आजतागायत कामावर रुजू झाला नाही. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी रानविहिर येथील शाळेचा एक शिक्षक पाठवून पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.