नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील अवैध व्यवसायांचा आवाज नुकताच हिवाळी अधिवेशनात घुमला होता. हा प्रश्न अधिवेशनात येणार म्हणून शहरातील हुक्का पार्लर, पब आणि ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी अंकुश ठेवला होता. अधिवेशन संपताच या अवैध व्यवसायांवर घातलेली वेसण पुन्हा सैल झाली असून यातील हुक्का पार्लरमधील धुरांचे लोट पुन्हा एकदा सुरू झाले आहेत.
नवी मुंबई शहराला हुक्का पार्लरचे ग्रहण लागले आहे. यात एपीएमसी परिसर आघाडीवर असून आठ ते नऊ हुक्का पार्लर सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे. यात महाविद्यालयीन तरुण-तरुणी हुक्क्याच्या नशेच्या अधीन होत आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत हुक्का ओढत धुरांचे लोट सोडणे तरुणांमध्ये फॅशन समजली जाऊ लागली आहे. याचाच पुरेपूर फायदा हुक्का पार्लर व्यावसायिकांकडून घेतला जात आहे.
तरुण-तरुणांना आकर्षण ठरेल, अशी जाहिरातबाजी किंवा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार, मध्यरात्रीपर्यंत शहरातील हुक्का पार्लरमध्ये तरुणाई रमत आहे. हुक्का पार्लरसोबतच नवी मुंबई शहरात अंमली पदार्थ व्यवसाय, ऑर्केस्ट्रा बार तेजीत सुरू आहेत.
याबाबत राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आवाज घुमला तर मागील पावसाळी अधिवेशनात देखील राज्यातील अवैध व्यवसायांचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार बारचे परवाने निलंबित केले होते. आता देखील अधिवेशनादरम्यान असे व्यवसाय बंद ठेवण्याचे गुप्त संदेश देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र अधिवेशन संपताच हुक्का पार्लरमधून धुरांचे लोट सोडणे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. एपीएमसीमधील सेवंथ स्काय या पार्लरमधून असे धुरांचे लोट सोडल्याचे समोर आले.
परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस नजर ठेऊन असतात. त्यामुळे सेवंथ स्काय व एपीएमसी परिसरातील इतर हुक्का पार्लरवर पोलिसांनी या आधीही कारवाया केल्या आहेत. त्यामुळे ज्यावेळी असे हुक्का पार्लर सुरू असतील त्यावेळी तक्रारदारांनी पोलिसांना असे व्हिडिओ पाठवल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे एपीएमसी पोलीस ठाण्याचेवरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले.