नवनियुक्त पोलीस आयुक्तांपुढे आव्हान
ठाणे: ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील ३५ पोलिस स्थानक परिसरात रोज घरफोडी, चोऱ्या, हत्या, फसवणूक, सायबर क्राईम, बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद महिन्याला किमान एक हजार एवढी होत आहे. गेल्या ११ महिन्यांत सुमारे ११ हजार गुन्हे नोंद झाले आहेत. सांस्कृतिक शहराकडे वाटचाल करणाऱ्या या महानगरांना गुन्हेगारीचा विळखा बसत असून नवनियुक्त पोलीस आयुक्त आणि प्रशासनापुढे आगामी काळात आव्हान उभे राहू शकते.
२०२३ हे वर्ष ठाण्यासाठी असुरक्षित ठरले आहे. एकीकडे राजरोसपणे सुरू असलेल्या घरफोड्या, सोनसाखळी चोर्या, वाहनांची चोरी, डान्सबार, हुक्का पार्लर, स्पाच्या नावाखाली होणारा देहव्यापार आणि फसवणुक यासारख्या गुन्हे वाढीस लागले आहेत. तर दुसरीकडे हाय प्रोफाईल हत्याकांड, एकतर्फी प्रेमातून झालेली हत्या, दहशतवादी संघटनांचे हस्तक सापडल्याने ठाणे जिल्हा हादरून गेला आहे.
यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये ८० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले. पत्नी आणि आपल्या दोन मुलांची हत्या करून परराज्यात पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ऑगस्टमध्ये कल्याणमध्ये एकतर्फी प्रेमातून भरवस्तीत एका १२ वर्षीय मुलीची हत्या झाली होती. त्यानंतर कल्याण भागातच नोव्हेंबरमध्ये एकतर्फी प्रेमातून एका मुलीला मारहाण झाल्याची घटनाही घडली होती. कधी अंगावर थुंकला म्हणून तर कधी आर्थिक व्यवहारातून ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये हत्यासत्र सुरुच आहेत. दरम्यान हत्येच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना ८८ टक्के यश आले आहे. ही समाधानाची बाब असली तरी वाढत्या हत्या रोखणे हे पोलिसांसमोर आव्हानच आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चोरी, लुटमारीचे प्रकार वाढल्याचेही दिसून येत आहे. प्रत्येक महिन्याला अशा गुन्ह्यांची २०० पेक्षा जास्त घटनांची नोंद होत आहे. अंगावर दागिने घालून चालणे कठीण झाले आहे. राबोडीत १ जुलै रोजी चाकूच्या धाकावर रिक्षा थांबवून प्रवाशाला लुटल्याची घटना घडली होती. १ नोव्हेंबरला चरई परिसरात पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धेच्या गळयातून सोनसाखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. तर याच महिन्यात पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या ७० वर्षीय फिर्यादीची सोनसाखळी खेचून त्यांना जखमी करण्यात आले. वागळे इस्टेट येथे घरात एकटीच राहणार्या ८५ वर्षीय वृद्धाला लुटण्यात आले. घरफोडीच्या घटनांनीही उच्चांक गाठला असून कल्याण, डोंबिवली ही शहरे दरोडेखोरांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सायबर गुन्हेगारीचाही धोका वाढला असून आठ महिन्यात आयटी कायद्यांतर्गत ४०७ गुन्हे दाखल होते. म्हणजे सरासरी महिन्याला ५० सायबर गुन्हे घडत असून दिवसाला दोन सावज या जाळ्यात अडकत आहेत. काही महिन्यांपूर्वी पेंमेंट गेटवेची सुविधा देणार्या संगणक प्रणालीत प्रवेश करून सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या बँक खात्यामधील २५ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार गाजला होता. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये तब्बल २४१ बँक खात्यामध्ये १६ हजार १८० कोटींची उलाढाल झाल्याचे समोर आले होते. याशिवाय ऑनलाईन कर्ज, नोकरीचे आमिष, लग्नाचे आमिष, क्रेडीट, डेबीट कार्ड, वीज भरणा आदी अनेक प्रकाराने फसवणूक सुरूच आहे. मात्र या तुलनेत तापस मात्र धिम्या गतीने होत असून केवळ २० फिर्यादींनाच रक्कम परत मिळाली आहे.
२०२१ मध्ये २०२०च्या तुलनेत अडीच हजाराने वाढ झाली होती. २०२२ मध्ये पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये १० हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तर यावर्षी २०२३ मध्ये ११ महिन्यात ११ हजाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
जानेवारी २०२३ मध्ये-१०६७ गुन्हे, फेब्रुवारी- ९६०, मार्च-१०६३, एप्रिल-१०४८, मे-१००६, जून-९५९, जुलै- ९१६, ऑगस्ट-९९४, सप्टेंबर-८८१, ऑक्टोबर-११९०, नोव्हेंबर-१००८
२०२२ साली गुन्ह्यांची उकल करण्यात ठाणे पोलिसांना ६८ टक्के यश आले होते. पण यावर्षी ही कामगिरी घसरली असून अवघे ५५ ते ६० टक्केच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. यावर्षी दाखल ११ हजार गुन्ह्यांपैकी केवळ साडेसहा हजार गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार अद्यापतरी पोलिसांच्या अवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे.