ठाणे: डम्पिंगसारखे प्रश्न सोडवण्यासाठी जनसहभाग अपेक्षित असतो आणि समाजाची त्याबाबत अनुकूल मानसिकता घडवण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा, असे मत पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रतीथयश एसएमसी संस्थेचे संचालक सुहास मेहता म्हणाले.
ठाणेवैभव आयोजित आणि वावीकर आय इन्स्टिट्यूट पुरस्कृत ठाणे व्हिजन 2023 कार्यक्रमात ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी श्री. मेहता यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री.मेहता यांनी बोलताना गोव्यातील कचऱ्यापासून खत आणि वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली.’ हा प्रकल्प गेली सहा वर्षे सुरू असून 160 शाळांतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली आहे. हा प्रकल्प पाहिल्यावर गोव्यामध्ये ओला आणि सुका कचरा यांचे विभाजन करण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी बजावली’, असे श्री.मेहता म्हणाले. ठाण्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना हा प्रकल्प दाखवण्याची तयारी श्री. मेहता यांनी यावेळी दाखवली.
स्मार्ट सिटी प्रकल्पाची कार्यपद्धती समजावून सांगताना श्री. मेहता यांनी ठाण्यातील नियोजित रेल्वे स्थानक कोपरीचा पूल तसेच पूर्व ठाण्यातील सॅटिस आदी योजना या प्रकल्पांतर्गत होत असल्याचे सांगितले. शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून पिण्यासाठी लागणाऱ्या शुद्ध पाण्याचा अधिक काटेकोरपणे वापर करणे शक्य होईल. महापालिकेतील उद्याने आणि बागा तसेच पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी हे पाणी वापरले जाणे आवश्यक आहे, असे श्री. मेहता म्हणाले. शहराचे नियोजन करताना भविष्यातील संभाव्य लोकसंख्येचा विचार केला जात असतो, परंतु अनेकदा वाढत्या शहरीकरणामुळे हे अंदाज चुकू शकतात आणि त्याचा परिणाम सुविधांवर होतो असेही ते म्हणाले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठाण्यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये मंजूर झाले असून त्या अंतर्गत कामे सुरू आहेत, असेही ते म्हणाले. जन सहभाग या कार्यात आवश्यक असतो असे सांगून विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या शहराच्या विकास कामात रस घेण्याचे आवाहन केले.
श्री. मेहता यांचे स्वागत ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले. यावेळी डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, सरस्वती विद्यालयाच्या चेअरमन मीरा कोर्डे उपस्थित होते.