एका ऐतिहासिक विजयात भारतीय महिलांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर ३९ वर्षांनंतर महिलांच्या कसोटीचे आयोजन करण्यात आले आणि योगायोगाने येथे खेळली गेलेली शेवटची कसोटीही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. आतापर्यंत त्यांनी एकमेकांविरुद्ध डझनभर कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी भारताने एक तर ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकले आहेत.
भारताने चौथ्या दिवसाची सुरुवात धमाकेदारपणे केली कारण त्यांनी खेळाच्या दुसऱ्याच षटकात अॅशले गार्डनरला (७) बाद केले. पूजा वस्त्राकरने उत्कृष्ट इन-स्विंगिंग यॉर्कर टाकून गार्डनरला लेग बिफोर विकेट आऊट केले. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला तिच्या ओव्हरनाईट धावसंख्येमध्ये एकही धाव जोडता आली नाही.
भारताने आक्रमण सुरूच ठेवल्याने ऑस्ट्रेलियाला धावा करण्याची जास्त संधी मिळाली नाही. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर आणि वस्त्राकर यांनी दिवसाच्या कामकाजाला सुरुवात करण्यासाठी प्रत्येकी तीन षटके टाकल्यानंतर हरमनप्रीत कौर तिच्या ऑफस्पिनर्स स्नेह राणा आणि दीप्ती शर्माकडे वळली. राणाच्या नावावर या डावात आधीच दोन विकेट्स होत्या आणि तिला आणखी दोन विकेट्स पटकवायला जास्त वेळ लागला नाही. तिने सलग दोन चेंडूत अॅनाबेल सदरलँड (२७) आणि अलाना किंग (०) यांना तंबूत परत पाठवले. सदरलँडच्या ग्लोव्हला चेंडू लागला आणि तो थेट यष्टीरक्षक यस्तिका भाटियाच्या हातात जाऊन सापडला. किंगने फ्रंट फुटवर चेंडू डिफेन्ड करायचा प्रयत्न केला पण तो जागच्याजागी टप्पा घेऊन स्टम्प्सला जाऊन लागला.
पाहुण्यांनी ७३ धावांची आघाडी घेतली होती पण त्यांचे आठ गडी बाद झाले होते. नंतर दीप्ती शर्माच्या जागी डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडचा आक्रमणात समावेश करण्यात आला. स्पेलच्या पहिल्याच षटकात तिने किम गार्थची (४) विकेट घेतली. तिने सामन्यात टाकलेल्या ४०.२ षटके विकेट रहित राहिल्यानंतर गायकवाडने अखेरीस तिचा खाता उघडला. तिच्या फिरकीची कमाल दाखवत ऑस्ट्रेलियाच्या १० व्या क्रमांकाचा फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. तिच्या स्पेलच्या दुस-या षटकात गायकवाडने पुन्हा एक क्लीन बोल्ड रचून तिची विरुद्ध क्रमांक असलेली जेस जोनासन (९) ला बाद केले. तिने ४२ चेंडूंच्या मुक्कामात कडवी झुंज दिली. ऑस्ट्रेलिया १०५.४ षटकांत २६१ धावा करून ऑल आऊट झाले आणि भारतासमोर ७५ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या राहिलेल्या पाच विकेट्स काढून त्यांना बाद करण्यासाठी भारताला फक्त १५.४ षटके लागली.
भारताने धावांच्या पाठलागाची सुरुवात शानदार प्रकारे केली. सलामी फलंदाज शेफाली वर्मा हिने किम गार्थने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर एक्सट्रा कव्हर्सच्या दिशेने चौकार मारला. तथापि, वर्मा (४) जास्त काळ टिकू शकली नाही कारण ती त्याच षटकात यष्टिरक्षक अॅलिसा हिलीकडे झेलबाद झाली. ऑस्ट्रेलियाकडे चौथ्या षटकात भारताची दुसरी विकेट घ्यायची सुवर्ण संधी होते पण त्यांनी ती हुकली. बेथ मुनीला पहिल्या स्लिपमध्ये अॅशले गार्डनरच्या गोलंदाजीवर नियमन झेल पकडता नाही आला आणि घोषला (०) जीवनदान मिळाले.
स्मृती मंधाना आणि घोष यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. ती भागीदारी भक्कम वाटत असताना ऑस्ट्रेलियाला घोषची विकेट काढण्यात यश मिळाले. घोष (१३) हवेत एक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाली. जोनासनच्या आधीच्या षटकात मंधानाला हवेत शॉर्ट खेळताना पाहिल्यानंतर, घोष गार्डनरच्या गोलंदाजीवर तसाच एक प्रयोग करून पाहण्यास उत्सुक होती. मात्र, तिची शॉर्ट टाईमिंग चुकली आणि मिड-ऑनला उभ्या असलेल्या ताहलिया मॅकग्राला कॅच दिला. धावांचा पाठलाग करताना भारताला आणखी काही अडथळे आले नाहीत कारण जेमिमाह रॉड्रिग्सने (१२ नाबाद) मंधानाची (३८ नाबाद) साथ देऊन भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. जोनासनच्या डोक्यावरून चौकार मारत मंधानाने विजयी धावा फटकावल्या.
भारताच्या या अविस्मरणीय विजयाचे वैशिष्ट्य उत्कृष्ट सांघिक प्रयत्नाने होते, तथापि सर्वात प्रभावशाली योगदान देणारी एक खेळाडू होती ऑफस्पिनर स्नेह राणा. राणाने ४४.४ षटकात नऊ मेडन्ससह ११९ धावा देऊन सात गडी बाद केले आणि तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या प्रदर्शनासाठी तिने सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
गेल्या १० दिवसांत भारताने दोन कसोटी सामने जिंकले. प्रथम इंग्लंडविरुद्ध आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध. खरंच, भारतीय महिला क्रिकेट संघ आणि त्यांच्या सर्व चाहत्यांसाठी नाताळ जणू लवकरच आला.
संक्षिप्त स्कोअरकार्ड
ऑस्ट्रेलिया ७७.४ षटकांत २१९ (ताहलिया मॅकग्रा ५०; पूजा वस्त्रकार ४/५३)
भारत १२६.३ षटकांत ४०६ (दीप्ती शर्मा ७८; अॅशले गार्डनर ४/१००)
ऑस्ट्रेलिया १०५.४ षटकांत २६१ (ताहलिया मॅकग्रा ७३; स्नेह राणा ४/६३)
भारत १८.४ षटकांत ७५/२ (स्मृती मंधाना ३८ नाबाद; अॅशले गार्डनर १/१८)