मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात १२१ धावांनी पिछाडीवर केली होती आणि त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक होत्या. स्मृती मानधना (४३ नाबाद) आणि स्नेह राणा (४ नाबाद) यांनी भारताकडून खेळीची सुरुवात केली. सामन्याचा पहिला दिवस समाप्त होण्यासाठी १४ चेंडू शिल्लक असताना राणा फलंदाजी करायला आली. ती नाबाद राहिली आणि दुसऱ्या दिवशी मानधनाबरोबर ५० धावांची भागीदारी करण्यात यशस्वी राहिली. तथापि, त्यांची भागीदारी ऍशले गार्डनरने तोडली जेव्हा तिने राणाला (९) क्लीन बोल्ड केले. काही मिनिटातच मानधनाला सुद्धा (७४) परत जावे लागले कारण किम गार्थ आणि गार्डनरने मिळून तिला धावबाद केले. तिसरे कसोटी अर्धशतक झळकावणारी ही सलामीची फलंदाज शतकासाठी पात्र होती पण ती गाठण्यात ती अपयशी ठरली.
दोन झटपट विकेट्स गमावल्यानंतर, भारताला भक्कम भागीदारी हवी होती, कारण ते अजूनही ७२ धावांनी पिछाडीवर होते. जेमिमाह रॉड्रिग्स आणि कसोटी क्रिकेटमध्ये डेबू करणारी रिचा घोष यांनी एकत्र येऊन चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची शानदार भागीदारी केली, जी महिलांच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दुसरी सर्वोच्च भागीदारी देखील होती. दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला आघाडीवर नेले. आक्रमक खेळीचा प्रयत्न करताना घोषने (५२) आपली विकेट गार्थला दिली, जी तिची या सामन्यातील पहिली विकेट होती.
४२ धावांची आघाडी घेऊन भारत एका चांगल्या परिस्थितीत होते कारण त्यांच्याकडे अजूनही बरीच फलंदाजी शिल्लक होती. कर्णधार हरमनप्रीत कौर, यष्टीरक्षक यस्तिका भाटिया आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांच्यासारख्या खेळाडू येणे बाकी होते. गार्डनर, जिच्या नावावर आधीच एक विकेट होती, तिने तिच्या सलग दोन षटकात दोन विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा गेममध्ये आणले. आधी तिने कौरला (०) आऊट केले आणि नंतर भाटियाला (१) पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. हे दोन्ही फलंदाज लेग बिफोर विकेट बाद झाले. कौरला कमी उसळीचा चेंडू मिळाला तर भाटियाला स्वीप शॉर्ट न मारता आल्यामुळे तिची विकेट गेली.
गार्डनरची चौथी आणि महत्त्वाची विकेट रॉड्रिग्जची होती. मुंबईची ही फलंदाज ७३ धावांवर फलंदाजी करत असताना ती आपले पहिले कसोटी शतक झळकवेल असे वाटत होते. पण जेव्हा गार्डनरने तिला कव्हर ड्राईव्ह खेळण्यास आकर्षित केले तेव्हा तिने चेंडू हवेत मारला आणि कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या अनाबेल सदरलँडला कॅच दिला.
घोष-रॉड्रिग्जच्या शतकीय भागीदारी नंतर भारताला अजून एक तशीच कामगिरी लाभली. शर्मा आणि वस्त्राकर यांनी आठव्या विकेटसाठी आणखी १०२ धावा जोडल्या. त्यांच्या या भागीदारीमुळे भारताची स्थिती आणखी मजबूत झाली. या डाव्या हाताच्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या संयोजनाने पाहुण्यांना खूप त्रास दिला. त्यांना सतत क्षेत्ररक्षणात आणि गोलंदाजीत बदलाव करायला लागत होते. ऑस्ट्रेलिया शर्मा आणि वस्त्रकारला आऊट करण्यात अपयशी ठरले. दुसरा दिवस संपन्न झाला तेव्हा भारताचा स्कोर होता ३७६ धावा आणि सात गडी बाद. भारताने १५७ धावांची चांगली आघाडी घेतली आहे. शर्माने तिचे चौथे कसोटी अर्धशतक झळकावले असून ती ७० धावांवर नाबाद आहे तर वस्त्रकर ३३ धावांवर अपराजित आहे.