रोटरीच्या चाचणीतून पुढे आली माहिती
(विशेष प्रतिनिधी)
ठाणे : राज्य सरकारतर्फे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आणि सकस आहार यांसारख्या योजना राबवल्या जात असल्या तरी सुमारे २५ ते ४० टक्के मुले ॲनेमिक आढळत आहेत.
ही धक्कादायक माहिती अलीकडेच समोर आली, जेव्हा रोटरी क्लबतर्फे मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील काही जि. प. शाळांतील मुलांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली तेव्हा. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि आयकेएस केअर फाऊंडेशन यांच्या वतीने आरोग्य तपासणीची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून सध्या मुरबाड येथील भुवन, दहिगाव आदी आदिवासी पट्ट्यात हा उपक्रम सुरु आहे.
या पाहणीबद्दल बोलताना एका मुख्याध्यापकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘आम्हाला ही सर्व मुले वरकरणी सुदृढ दिसत होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तपासणी झाली तेव्हा वस्तुस्थिती कळली’.
‘आयकेएस’चे डॉ. मितुल ठक्कर यांनाही हे निष्कर्ष आश्चर्यकारक वाटत आहेत. ‘या शाळांतून नियमितपणे खिचडी, भाज्या, केळी, बिस्किटे वगैरे दिली जात असली तरी मुले ॲनेमिक आढळत आहेत. त्याबाबत खोलात जाऊन तपास करावा लागेल.’
या शाळांतील मुख्याध्यापकांनी सरकारी आहार योजना शिस्तबद्ध पद्धतीने अंमलात आणल्या जात असल्याचे सांगितले. पहिली ते पाचवीच्या मुलांना शंभर ग्रॅम तर ६ वी ते ८ वी च्या मुलांना १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो. पूर्वी तूरडाळ मिळायची. त्याऐवजी मसूर डाळ ०.९०० आणि ०. ३०० या प्रमाणात दिले जाते. भाज्यांमध्ये वांगी-बटाटा अधिक प्रमाणात असतो. केळी-बिस्किटे अधूनमधून दिली जातात. चिक्की आणि अंडी दिली गेली तर रक्तातले लोह वाढेल,’ असे ते म्हणाले.
सरकारतर्फे शाळा-शाळांतून ठरवण्यात आलेल्या प्रमाणात शिधा पुरवला जातो आणि महिला बचत गटातर्फे तो शिजवून मुलांना दिला जात असतो.
या शाळा करीत असलेल्या सहकार्याबद्दल रोटरीचे सदस्य शैलेश कोरे यांनी समाधान व्यक्त केले. ‘जी औषधे आम्ही पुरवत आहोत ती स्थनिक बालरोग तज्ज्ञांना विचारून केली जातात. तीन महिने औषधे मोफत पुरवली जातील आणि काही शाळांनी मुलांना शाळेतच औषधे देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे,’ असे डॉ. ठक्कर म्हणाले.