ठाणे आणि कल्याणसाठी नऊ हजार कोटींचे प्रकल्प

* एमएमआरडीए करणार वाहतूक निर्धोक
* सात महत्वाच्या कामांना प्राधान्य

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दळणवळणाचे जाळे निर्माण करण्यासाठी ठाणे आणि कल्याण शहरांशी निगडीत सात महत्वाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. या सर्व कामांचा अंदाजे खर्च ८९३५ कोटी रुपये असून मुंबईतील एका प्रकल्पासाठी ५२६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

वाढत्या नागरिकरणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली असून दळण वळणाचे जाळे निर्माण करण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, खाडी समांतर रस्ते आदी प्रकल्पांवर एमएमआरडीएने लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः ठाणे, कल्याण, नवी मुंबई या महानगरांना जोडणारे हे मार्ग आगामी १० ते १५ वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहेत. पुढील २५ वर्षांत वाढती लोकसंख्या, वाहने, औद्योगिकीकरण लक्षात घेऊन महत्वाच्या सात प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.

प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सुसाध्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल, निविदा आदी कामांसाठी पुनर्विलोकन करण्याकरिता तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला आहे.

एमएमआरडीएमार्फत विविध पायाभूत प्रकल्पांची कामे करण्यात येतील. त्या अनुषंगाने नजीकच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सूची करण्यात आली. त्यामध्ये महत्वाचे रस्ते, बोगदे आणि पूल आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

एमएमआरडीएने तयार केलेल्या प्रकल्पांच्या सूचित ठाणे खाडी किनारा मार्गाचे बांधकाम -2170 कोटी, पूर्व मुक्त मार्गाचे ठाणेपर्यंत विस्तारीकरण-2070 कोटी, साकेत उन्नत मार्ग बांधकाम-1600 कोटी, काटई नाकापर्यंत उन्नत मार्गाचे बांधकाम-907 कोटी, ठाणे खाडीवरील पुलांचे काम (एक) गायमुख ते पायगाव (दोन) कासारवडवली ते खारबाव आणि (तीन)कोलशेत ते काल्हेर यासाठी तब्बल 1698 कोटी, कल्याण वळण रस्त्याचे बांधकाम 400 कोटी अशी ८९३५ कोटींची कामे होणार आहेत. तर मुंबईतील ऑरेंज ते मरीन ड्राईव्हपर्यंत भुयारी मार्गाची 5260 कोटी खर्च होणार आहेत.

प्राधिकरणाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार नव्याने हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांचा सुसाध्यता अहवाल तयार करण्यात येईल आणि अत्यंत महत्वाच्या ठिकाणी जाऊन विविध सर्वेक्षणे व पाहणी करून प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.

सल्ला आणि पडताळण्या पूर्ण करून सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाच्या कार्यान्वयासाठी ठेकेदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या कामांच्या स्वरूपाबद्दल एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, या सात महत्त्वाच्या कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता प्राधिकरणामार्फत स्वतंत्रपणे सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठीही होणा-या कामांचीही निविदा प्रक्रिया होणार आहे.