ठाणे हे तलावांसाठी ओळखले जाते, परंतु फार कमी लोकांना त्याच्या समृद्ध क्रिकेट संस्कृतीबद्दल कल्पना असेल. दादोजी कोंडदेव स्टेडियम हे रणजी करंडक सामन्यांचे एकेकाळी केंद्र होते. ज्या वास्तूने सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजांची कामगिरी बघितली तिने सचिनचा मुलगा अर्जुनलाही खेळताना पहिले.
क्रिकेटचे ख्यातनाम आकडेतज्ञ ठाण्यातील सुधीर वैद्य यांनी 1876-77 पासून खेळले गेलेले कसोटी क्रिकेट सामने, 1970-71 पासून खेळले गेलेले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 1892 मध्ये भारतातील देशांतर्गत क्रिकेटच्या स्थापनेपासूनचे जवळपास सर्व सामन्यांचे प्रत्येक रेकॉर्ड जमवले आहे. त्यांनी ठाणेवैभवला सांगितले, “खंडू रांगणेकर, नीलेश कुलकर्णी, अभिजित काळे आणि आविष्कार साळवी चार ठाणेकर खेळाडू भारतीय संघातर्फे खेळले. याशिवाय तुकाराम सुर्वे आणि सुलक्षण कुलकर्णी रणजी करंडक स्तरावर खेळले. याखेरीज आपल्याकडे पिलू रिपोर्टर आणि एम वाय गुप्ते यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय पंच होते.”
सध्या ठाण्याचे तीन क्रिकेटपटू बीसीसीआयशी संलग्न असलेल्या प्रमुख पुरुष राज्य क्रिकेट संघांचे मुख्य प्रशिक्षक आहेत. सुलक्षण कुलकर्णी हे तमिळनाडूसारख्या संघाचे प्रशिक्षक आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक या संघाचा कर्णधार आहे. आविष्कार साळवी हे पंजाबचे प्रशिक्षक आहेत. या संघाने 2023 ला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे आणि ओंकार साळवी हे मुंबई संघाचे प्रशिक्षक आहेत. मुंबईने 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. सुलक्षण कुलकर्णी यांनी साळवी बंधूंना प्रशिक्षण दिले होते आणि आता हे तिघेही भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्तरावर एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत आहेत, हे विशेष.
कुलकर्णी या तिघांपैकी सर्वात वरिष्ठ. त्यांनी सर्वात जास्त (६६) रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत. ते यष्टीरक्षक-फलंदाज होते, ज्यांनी आपले बहुतांश क्रिकेट मुंबईसाठी खेळले. त्याचबरोबर ते काही काळ रेल्वे, आसाम, विदर्भ आणि मध्य प्रदेशसाठी खेळले. दुसरीकडे, आविष्कर, एक वेगवान गोलंदाज म्हणून मुंबईकडून खेळला आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलही खेळला. आविष्कार प्रमाणेच, मोठा भाऊ ओंकार वेगवान गोलंदाज होता. तो रेल्वेतर्फे खेळत असे.
कुलकर्णीने आपल्या कोचिंग प्रवासाची सुरुवात मुंबई U19 ने केली. नंतर त्यांनी विदर्भ आणि सेंट्रल झोन यांना प्रशिक्षण दिले. योगायोगाने त्यांना पुन्हा मुंबईत येण्याची संधी मिळाली जेव्हा मुंबई वरिष्ठ संघाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2012-13 रणजी ट्रॉफी जिंकली. ते जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसले तरी 2018 मध्ये नेपाळसाठी त्यांची नियुक्ती झाल्यावर त्यांना आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाली. पुढे 2019 मध्ये त्यांना शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक क्रिकेट विश्वचषकासाठी टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून एक रोमांचक ऑफर मिळाली. भारताने तो विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! 2023 मध्ये, त्यांच्याकडे तामिळनाडूच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली. हा संघ भारताचे माजी आणि सध्याचे क्रिकेटपटू आणि आयपीएल तार्यांनी भरला आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्रा सारखीच बॉलिंग अॅक्शन असलेल्या आविष्करने 2018 मध्ये पुद्दुचेरी येथे आपल्या कोचिंग कारकीर्दीची सुरुवात केली. नंतर, ओमानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली, जे 2021 मध्ये संयुक्त अरब अमरेतमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरले. आंतरराष्ट्रीय यश मिळवून ते भारतात परतले आणि 2022 मध्ये पंजाबचे मुख्य प्रशिक्षकम्हणून जबाबदारी स्वीकारली. क्रिकेटसोबतच ते शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट आहेत. त्यांच्या नावी ऍस्ट्रोफिसिक्समध्ये पीएचडी आहे.
आपल्या भावाप्रमाणे, ओंकारने खेळण्यापासून निवृत्त झाल्यावर कोचिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. ते जरी आयपीएलमध्ये कधीच खेळले नसले तरी त्यांच्या क्षमतेची ओळख कोलकता नाइट रायडर्सनेना होती कारण त्यांनी ओंकारला सहायक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले. त्याचप्रमाणे ओंकार कधीही मुंबईसाठी खेळले नाहीत, पण मुंबईसारख्या चॅम्पियन संघाला प्रशिक्षकपद मिळणे ही त्यांच्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे.
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये, कुलकर्णीच्या तामिळनाडूने ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दोन सामने खेळले आहेत. योगायोगाने कुलकर्णी यांनी याच दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या मैदानावर पहिल्यांदा मुंबईसाठी खेळले होते. कुलकर्णींना पुन्हा ठाण्यात यायची सुवर्ण संधी मिळाली परंतु साळवी बंधूंची घर वापसीच्या प्रतीक्षेत आहेत.