रेती ते आयटी!

रेती उत्पादकांचे अभिनव पुनर्वसन

ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या महत्वाकांक्षी पारसिक चौपाटी प्रकल्पासाठी आपला पिढीजात व्यवसाय गमावलेले भुमिपूत्र येणार्‍या काळात आयटी पार्कच्या दिशेने झेप घेणार आहेत.

मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे मनोरंजन, हॉटेल आणि पार्कींगसारख्या व्यवसायाची केंद्रे बनवून हजारो तरुण भूमीपूत्रांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा होणार आहे.

गेल्या सात वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या या प्रकल्पबाधितांना ठाणे महापालिकेने २२०० मीटर, १५००, ७५० आणि २५० चौरस मीटर असे चार भुखंड पुनर्वसनासाठी देण्याचे मान्य केले आहे. त्यातूनच आधुनिकतेची कास धरत उत्पन्न आणि रोजगार निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे.

ठाणे शहराच्या सौंदर्यांत भर टाकण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची चौपाटी उभारण्याचे काम ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेतले. मात्र हे काम हाती घेत असताना येथे पिढ्यानपिढ्या डुबी रेती उपसा करणारे आणि त्यावर आधारित व्यवसाय करणारे भूमीपूत्र विस्थापित झाले. २०१७ साली तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानिकांचे पुनर्वसन करण्याचा शब्द देत संपूर्ण अतिक्रमण मोकळे केले. मात्र या घटनेला आता सात वर्षे झाली तरी चौपाटी बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच राहिला. दरम्यान आपल्या न्याय हक्कासाठी मुंब्रा पारसिक रेतीबंदर फेडरेशनचा पालिका ते राज्य शासनपर्यंत लढा सुरुच राहिला. या लढयाला अखेर आता यश आले आहे.

मुंब्रा पारसिक रेतीबंदर फेडरेशनचे अध्यक्ष आर. सी पाटील, उपाध्यक्ष रविंद्र पाटील, प्रमुख सल्लागार दशरथ पाटील यांच्यासह सुकाणू समितीची मंगळवारी ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पारसिक रेतीबंदर परिसरात २,२०० चौरस मीटर, १,५०० चौरस मीटर, ७५० चौरस मीटर आणि २५० चौरस मीटर असे चार प्रकारचे भुखंड लवकरच पालिका प्रकल्पबाधितांसाठी हस्तांतरित करणार असल्याची माहिती दशरथ पाटील यांनी दिली. या भुखंडाचा विकास करून रोजगार निर्मिती करण्याच्या सुचना यावेळी पालिका आयुक्तांनी केल्या. मात्र त्याआधीच फेडरेशनने पुर्नविकासाचा आपला मास्टर प्लान तयार ठेवला होता. त्यानुसार या भुखंडावर यापुढे केवळ पारंपारिक व्यवसाय न करता काळाची गरज ओळखून आधुनिक व्यवसाय आणि रोजगार निर्मिती करण्यात येणार असल्याचेही दशरथ पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपायुक्त जी जी गोदापुरे, मनिष जोशी आणि उपजिल्हाधिकारी श्री. परदेशी यांचे मुंब्रा पारसिक फेडारेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत

२२०० चौरस मीटरचा भुखंड हा पारसिक रेतीबंदर चौपाटीच्या मधोमध आहे. तिथे आयटीपार्क उभारण्याची योजना आहे. या आयटीपार्कमध्ये स्थानिक भुमीपूत्र आणि त्यांच्या तरुण मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

७५० चौरस मीटरचा भुखंड मुंब्य्राच्या दिशेने आहे. तेथे अवजड वाहनांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पन्न तर मिळेलच पण या मार्गावरून जाणार्‍या अवजड वाहनांसाठी हक्काचे तळही मिळणार आहे.

कळव्याच्या दिशेने असलेल्या २५० चौरस मीटरच्या भुखंडावर उपहारगृहचे नियोजन आहे. तर १५०० चौरस मीटरच्या भुखंडावर मनोरंजन पार्क उभारण्यात येणार आहे.

भुखंडावर प्रकल्प उभारण्यापासून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाचे नियोजन मुंब्रा पारसिक रेतीबंदर फेडरेशन करणार आहे. पारसिक चौपाटी बाधितांमध्ये १०५ जणांचा समावेश आहे. या १०५ बाधितांना उत्पन्नाचा हिस्सा मिळणार आहे.