प्रसूतिगृहांचे बळकटीकरण: ११ कोटींचा प्रस्ताव तयार

ठाणे: मुख्यमंत्री मातृत्व योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेच्या प्रसूतीगृहांचे बळकटीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून ठाणे महापालिकेला ११ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे.

महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये २४ तास सेवा देण्यासाठी ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया विभाग नाही त्या ठिकाणी शस्त्रक्रिया विभाग निर्माण करण्यासोबतच या ठिकाणी आवश्यक डॉक्टर आणि परिचारिकांची भरती, तसेच आवश्यकतेप्रमाणे सिव्हिल वर्क करण्याचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.

खाजगी रुग्णालयांऐवजी ठाणे महापालिकेच्या प्रसूतीगृहात जास्तीत जास्त प्रसूती कशा होतील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी अंदाजे ३६ हजार गरोदर मातांची नोंदणी आरोग्य विभागामार्फत केली जाते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहा विभाग करण्यात आले आहेत. गरोदर मातेची नोंदणी, गर्भधारणेच्या काळातील मातेच्या आरोग्याची काळजी, प्रसूती, लसीकरण, रक्तक्षय असल्यास त्यावर उपचार, पोषण आहार या सर्वच बाबींचा विचार करण्यात आला आहे. याचसोबत प्रसूती गृहांचे बळकटीकरण या महत्वाच्या विषयाचा अंतर्भाव देखील या योजने अंतर्गत करण्यात आला असून येत्या काही काळात पालिकेच्या प्रसूतिगृहांचे बळकटीकरण केले जाणार आहे.

ठाणे महापालिकेची कोपरी, बाळकूम, मुंब्रा, रोजा गार्डेनिया, मीनाताई ठाकरे, कोरस अशी सहा प्रसूतिगृहे आहेत. या प्रसूतिगृहांमध्ये २४ तास सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया विभाग नाही त्या ठिकाणी या विभागाची निर्मिती केली जाणार आहे. हे करत असताना मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि परिचारिकांची भरती केली जाणार आहे. शिवाजी नगर येथील प्रसूतीगृह अद्ययावत करण्याचा देखील प्रस्ताव आहे. तसेच वर्ग चारची पदे देखील भरण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्षाला १० हजार प्रसुतीचे लक्ष

प्रसूतिगृहांमध्ये वर्षाला आठ हजार प्रसूती होतात. मात्र यामध्ये सिजर होत नाहीत. सिजर प्रसूती करण्याबरोबरच वर्षाला १० हजार प्रसूती कशा होतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कौसा येथे मॉड्युलर ओटी करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.