फाईव्ह स्टार वसतिगृह दिले; तुम्ही तशीच रुग्णसेवा द्या

मुख्यमंत्र्यांचे कळवा रुग्णालयातील डॉक्टरांना आवाहन

ठाणे : तुम्हाला फाईव्ह स्टार वसतिगृह दिले आहे, आता रुग्णांनाही तुम्ही फाईव्ह स्टार सुविधा द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांना केले.

या रुग्णालयाशी संलग्न असलेल्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे नूतनीकरण ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि पालिकेच्या अभियंत्यांचेही विशेष अभिनंदन केले.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर या रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर तसेच रुग्णालयाच्या कारभारावर चौफेर टीका करण्यात आली होती. याच रुग्णालयाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसहतीगृहाची दुरावस्था होती. या ठिकाणी राहत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुणालयाच्या वसतिगृहाचे नूतनीकरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वतः या कामात लक्ष घालून वसतिगृहाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या चार महिन्यात फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवेल अशापद्धतीने वसतिगृहाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये कँटीन, गार्डन आणि वसतिगृहाच्या खोल्या देखील फाईव्ह स्टार हॉटेलसारख्याच करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, रुग्णांना जर चांगली सेवा द्यायची असेल तर डॉक्टरांना देखील चांगल्या सुविधा द्यायला हव्यात. रुग्णालयाचा कणा हे डॉक्टरच असतात. त्यामुळे रुग्णालयाचे वसतिगृह हे फाईव्ह स्टार असावे अशी माझी इच्छा होती. या वसतिगृहाचे नूतनीकरण करताना दर्जामध्ये तडजोड नको अशा सूचनाही आपण दिल्या होत्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. आता तुम्हाला फाईव्ह स्टार वसतिगृह दिले आहे मग रुग्णांनाही फाईव्ह स्टार सेवा द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टरांना केले. रुग्णांना अशा पद्धतीने सेवा द्या की रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनीही पालिकेच्या रुग्णालयाचे नाव काढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.