ठाण्यात लघुउद्योजकांची बिझनेस जत्रा 

ठाणे: आर्थिक आणि सामाजिक इको सिस्टीम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघुउद्योजकांची बिझनेस जत्रा १ व २ डिसेंबर रोजी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे होत आहे.

लक्षवेध, ॲडमार्क मल्टीवेंचर, वा कोर्पोरेशन, वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात १२६ पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असुन वेगवेगळ्या इंडस्ट्रिजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याहस्ते होणार असुन मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, अशी माहिती या उपक्रमाचे सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकार, राज्य सरकार , टिसा, कोसिआ आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे ३ रे वर्ष असून दहा हजारहून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक दोन दिवसात भेट देणार आहेत.भारताच्या इको सिस्टीम तसेच, जीडीपीमध्ये लघु उद्योगांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघुउद्योगांना संकलित करणे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्यवेध आणि २० पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनाद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्या दरम्यान लघुउद्योजकांना तसेच नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आ. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने टो – गो या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अमंलबजवणीची सुरुवात होणार आहे.

विद्यार्थ्यानाही प्रदर्शन पाहण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध केली आहे. आतापर्यंत ४ ते ५ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले.