ठाण्यातील ४३ अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई

ठाणे: या शैक्षणिक वर्षात तब्बल ४३ अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केली असून यामध्ये सर्वाधिक शाळा या इंग्रजी माध्यमाच्या असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. महापालिका हद्दीत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत असल्याचे मुख्य कारण असू शकते असा कयास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

शहरातील कळवा, राबोडी, दिवा, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागातच या शाळांचा आकडा अधिक असल्याचे दिसून आले आहे. खास करुन दिव्यात या अनाधिकृत शाळांचा आकडा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यातील अनेक अनधिकृत शाळांना नोटीसा देऊन त्यांना दंड भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या शाळांनी नोटीसला कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता दंड देखील भरला नसल्याने या शैक्षणिक वर्षात अशाप्रकारच्या ४३ शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दिव्यातील दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा देखील समावेश असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.