इतिहासाचे जतन करणारा विकास हाच शाश्‍वत-न्या. अभय ओक

‘ठाणे-द इटर्नल सिटी’ पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे : ठाणे शहराला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे येथील प्रशासनाबरोबर नागरीकांचेही कर्तव्य असायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अभय ओक यांनी व्यक्त केले.
जो अल्वारिस लिखित ‘ठाणे-द इटर्नल सिटी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी न्या. ओक बोलत होते. ठाण्यात जन्मलेले आणि घडलेले न्या. ओक यांनी इतिहासाचे अनेक दाखले देताना शहराच्या आजच्या तथाकथित विकासात ऐतिहासिक परंपरेची जाणीव ठेवली जात नसल्याची खंत व्यक्त केली. ‘विकासाचे मापदंड बदलण्याची वेळ आली आहे.’ असे नमूद करताना न्या. ओक म्हणाले, आरोग्य, पर्यावरण, यांची काळजी घेणारी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. एकेकाळी 47 तलाव असणाऱ्या या शहरात जेमतेम 27 तलाव शिल्लक राहिले आहेत, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातून आमराई नष्ट झाली आहे, ज्या खाडीमार्गे जगभराचा व्यवहार चाले, तिची अवस्था केविलवाणी झाली आहे तर आधुनिक काळात रंगो बापूजी गुप्ते यांच्या नावाने असलेल्या तलावपाळीवरील चौकाचे नामांतरही करण्यात आले. हे सारे क्लेशदायक आहे.’
कार्यक्रमास माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीज बांगर, सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका पद्मश्री डॉ. शोभा घोष, प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे डॉ. विजय बेडेकर आदी उपस्थित होते. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी लेखक जो अल्वारिस यांची मुलाखत घेतली.
‘ठाणे हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष शहर होते याचा पुरावा ‘गोल्डन माईल’ या संकल्पनेतून लेखकाने मांडला.’ असे सांगून श्री. सहस्त्रबुद्धे यांनी इतिहासातील गड-किल्ले-आणि अन्य वास्तूंचे पर्यटन सुरु व्हायला हवे.’ असे सूचित केले.
आयुक्त बांगर यांनी ठाणे शहराचा इतिहास थक्क करणारा आहे, असे सांगून पुढच्या पिढ्यांना तो अवगत होण्यासाठी या पुस्तकाचा मराठीतून अनुवाद करण्याची गरज असल्याचे सांगितले.
आज जरी मुंबई देशाची आर्थिक राजधानी समजली जात असली तरी एकेकाळी हे स्थान ठाण्याने पटकावल्याचे असंख्य पुरावे इतिहासात नोंद होते, असे सांगून या पुस्तकात सुमारे 2200 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. अशा पुस्तकामुळे शहराबद्दलची आपुलकीची भावना वाढीस लागते, असेही श्री. अल्वारिस म्हणाले.

श्री. नरेंद्र बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. महेश बेडेकर यांनी केले. पाहुण्यांनी प्राच्य विद्या संस्थेच्या इमारतीमध्ये फेरफटका मारला. ऐंशी हजार दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा असणाऱ्या या संस्थेत पुरातत्व दृष्टीने महत्वाच्या काही वस्तूंचे संग्रहालय आहे.