संगीत गुरुकुलातून उत्तम कलाकार तयार होतील

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
* भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन

ठाणे: आतापर्यंत चार युगे होऊन गेली. पण कलीयुगातही सर्वश्रेष्ठ युग अनुभवले ते म्हणजे लतायुग. त्यांची ही स्मृती कायम रहावी याच भावनेतून ठाण्यात भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाची उभारणी होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या संगीत गुरुकूलातून भविष्यात उत्तम गायक, संगितकार, गीतकार तयार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजने अंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोकॉस आरक्षित भूखंड येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या म्हणून ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कृष्णा मंगेशकर, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळारामही ठाण्यातीलच होते. यामुळे ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून अनेक विद्यार्थी घडतील आणि संगीतकार घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच सरकार, महापालिका आणि व्यक्तिशः आपण या उपक्रमाला आवश्यक पाठबळ देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ठाण्याचे बदलते रूप बघून आपणाला आनंद वाटला. या ठाण्याला साजेशी इमारत लता मंगेशकर गुरुकुलसाठी आता उभारली जाणार आहे. त्याचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी या सोहळ्यात केले. तसेच, हे संगीत विद्यालय चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल आभार मानले.