महिलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

शहापूर: गुंज संस्था आणि शहापूर वनविभागाच्या माध्यमातून बावघर येथील महिलांनी गावालगत श्रमदानातून नाल्यावर वनराई बंधाऱ्याची उभारणी केली आहे.

श्रमदानातून उभारण्यात आलेला बंधारा गावाची भूजल पातळी वाढीसाठी वरदान ठरणार आहे. शिवाय यात जे पाणी अडले जाईल त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. या महिलांनी पाच तास श्रमदान करुन १२ मीटर लांब आणि एक मीटर उंचीचे दोन बंधारे तयार केले. बंधारे तयार करण्यासाठी वन विभागाच्या वनरक्षक डी. ए. शिंदे, वनपाल सी. एस. मौर्या, एस. बी. जाधव यांनी विशेष सहकार्य केले. विशेष म्हणजे गुंज संस्थेच्या जिल्हा समन्वयक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी सलग चार वर्ष एकत्रितपणे बंधारा बांधण्याच्या कामासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांनी केलेल्या या श्रमदानाबद्दल तालुक्यात सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.