प्रदूषणात उल्हासनगरने मुंबईला टाकले मागे

उल्हासनगर: हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेस खडे बोल सुनावले आहेत. तरीही मुंबईसह उल्हासनगर आणि बदलापूर या शहरांतील प्रदूषणात वाढ झाल्याची बाबदेखील उघड झाली आहे.

उल्हासनगरने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलादेखील मागे टाकले आहे. मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५० ते १७० असताना गेल्या पाच दिवसांत उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा २०० च्या वर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि उल्हासनगर शहरांचा समावेश आहे.

उच्च न्यायालयाने यासंबंधी खडे बोल सुनावल्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना यासंबंधी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईलादेखील मागे टाकल्याचे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक यावरून दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील हवेची गुणवत्ता पातळी ही २०० च्या वर नोंदवली गेली आहे. प्रत्यक्षात शहरातील हवेचा निर्देशांक हा १०० च्या खाली असणे आवश्यक असताना तो दुपटीने आहे.