विधानसभेवर शिवसेना नविन चेहरा पाठवणार

जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांचे प्रतिपादन

शहापूर: बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसेना पक्ष हा शहापूर तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला असून आगामी कार्यकर्ता मेळाव्यात त्याची ताकद दिसून येईल, असा आत्मविश्वास जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत नविन चेहऱ्याला संधी देणार असून शिवसेनेच्या प्रोटोकॉलनुसार तो चेहरा ठरवला जाईल असा सूतोवाच त्यांनी केले.

शहापूर तालुका संपर्कप्रमुख आकाश सावंत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मारुती धिर्डे बोलत होते. तालुक्यात राजकीय उलथापालथीला उधाण आले असताना शिंदे गटातील तथा शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुकाप्रमुख नंदकुमार मोगरे आणि विधानसभा संपर्कप्रमुख संजय निमसे यांनी नुकताच शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. शहापूर तालुका शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांची सांगड घालत बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेदरम्यान जनसामान्यांच्या मनातील विविध समस्यांना हात घालत जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. यामध्ये सापगाव- शहापूर रस्त्याचा मुद्दा, प्रलंबित डावा कालवा, मुरबी धरण, शाई धरण, प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेण्याचा प्रलंबित प्रश्न आदी मुद्दे
अधिक गाजले. यावेळी आगामी शहापूर विधानसभेच्या स्पर्धेत उतरलेल्या आजी-माजी इच्छुक उमेदवारीच्या नावांबाबत मुद्दा उपस्थित केला असता मारुती धिर्डे यांनी मतदारांच्या मर्जीतील आणि पसंतीचा उमेदवार देण्याची ग्वाही दिली.

यावेळी आकाश सावंत, सुधीर तेलवणे, वामन गायकर, निलेश भांडे, प्रकाश वेखंडे, अनिल घोडविंदे, शरद वेखंडे, धीरज झुगरे, विद्या फर्डे, आनंद झगडे, राजा वळवी, अशोक जाधव, गीता भोईर, अश्विनी अधिकारी, सचिन तावडे आदी उपस्थित होते.

#जिल्हा प्रमुखांनी मांडलेले ठळक मुद्दे#

★आम्ही युतीधर्म पाळत असलो तरी विद्यमान खासदार कपिल पाटील आमचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कोणतेच काम करत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे.
★शहापूर-सापगाव रस्त्याबाबत प्रशासकीय अधिकारी आमचेही ऐकत नाहीत.
★जेवढा निधी विद्यमान आमदाराला मिळाला नाही त्याच्या दुप्पट निधी माजी आमदाराला दिला.तथापि बरोरा यांनी शिंदे साहेबांच्या विश्वासाला तडा दिला असून आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याला विश्वासात न घेता ते पक्ष सोडून गेले.मात्र पांडुरंग बरोरा हे उत्कृष्ट काम करत होते.
★शिवसेना पक्षात ज्यांना करमत नाही त्यांनी खुशाल बाजूला व्हावे.
★जनतेने आमच्याकडे समस्या घेऊन यावे. त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू.
★2024 च्या विधानसभेला नविन चेहऱ्याला संधी देणार.मात्र शिवसेनेच्या प्रोटोकॉलनुसार उमेदवार ठरेल.