ठाणे : पोखरण रोड क्रमांक दोन येथील बेथनी रुग्णालयामागील बंद कंपनीत मंगळवारी राञी अचानक आग लागल्याची घटना घडली. तर ही घटना ताजी असताना बुधवारी दुपारी वागळे इस्टेट येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवित हानी झालेली नाही. मात्र आगीत लाखो रुपयांचे सामानाचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बेथनी रुग्णालयामागे एक मजली एनआरबी कंपनी आहे. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती मिळताच पाचपाखाडी आणि बाळकूम अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दोन फायर वाहन आणि वॉटर टँकर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण समोर आले नसून अधिक तपास सुरु आहे. अग्निशमन दलाकडून तब्बल एक तासाने या आगीवर नियंञण मिळवण्यात आले.
दुसऱ्या घटनेत बुधवारी दुपारी वागळे इस्टेटमधील जय भवानी नगर येथे आणखी एका कंपनीला आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या आगीत लाखोंच्या साहित्याचे नुकसान झाले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. जय भवानी नगर येथील ग्लोबल फार्मा इंडिया इंडस्ट्रियल डिस्ट्रीब्यूटर्स कंपनीच्या पोट माळ्यावरती असलेल्या साहित्याला आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण कर्मचारी, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे अधिकारी, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. आगीमध्ये पोट माळ्यावर असणारे नूडल्स, बिस्कीट, केक, क्रीम, शॉम्पू, माचिसचे बॉक्स जळून खाक झाले. तसेच जाहिरात बोर्डचे प्लास्टिक साहित्यही पूर्णपणे जाळून खाक झाले आहे.