किरकोळ बाजारात गाठली शंभरी
ठाणे : येथील महागिरी घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढतच असून, चांगल्या कांद्याची विक्री 80 ते 100 रुपये किलोने सुरू आहे. तर काळा पडलेल्या कांद्याचेही मूल्य 60 ते 70 रुपये इतके झाले आहेत.
ठाणे पट्ट्यातील आणि नवी मुंबईसह आसपासच्या शहरांतील किरकोळ बाजारात जास्त दराने उन्हाळ्यात कांदा मार्चमध्ये विक्रीसाठी येतो. हा कांदा किमान सात ते आठ महिन्यांसाठी साठवला जातो. ह्याच कांद्याचा साठा ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपतो. सध्याच्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कांदे खराब आणि सडके होत असल्यामुळे त्याची आवक घटली आहे. त्यामुळे काळा कांदाही 70 ते 80 रुपये विकला जात आहे, असे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले.
सोमवारपासून कांद्याच्या 166 गाड्या वाशी कृषी बाजार समितीमध्ये दाखल झाल्या. पण आलेला कांदा कमी दर्जाचा होता. त्याचाही 70 ते 100 रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री सुरू झाली आहे. मात्र हे कांदे आकाराने लहान आणि काहीसे खराब झालेले आहेत. त्याचा दर किमान 70 रुपये किलो असल्यामुळे उत्तम दर्जाच्या कांद्याची आवक कमी प्रमाणात झाली आहे, अशी माहिती ठाण्यातील किरकोळ बाजारातील कांदे विक्रेत्यांनी दिली. किरकोळ बाजारातील काही विक्रेते ‘तोंडाला येईल तसा दर’ सांगत होते, असे निदर्शनास आले.
चांगल्या प्रतीचे कांदे बाजारात मिळत नसल्यामुळे ग्राहकांना किरकोळ बाजारात जाऊन ‘अव्वाच्या सव्वा’ दराने कांदे खरेदी करावी लागत आहेत, असे चित्र पाहण्यास मिळाले. त्याचा फायदा किरकोळ बाजारातील कांदे विक्रेत्यांना होत आहे. कमी दर्जाचे कांदेही ठाणे शहरातील काही भागात 80 रुपयांनी तर काही ठिकाणी 100 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. नवी मुंबईमध्ये 90 रुपये प्रति किलोने कांदे विकले जात असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी आणि ठाणे मंडईतील कांदे विक्रेत्यांनी दिली.