प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना ठाणे महापालिका झाली नकोशी

* सहायक आयुक्तपदाच्या चार जागा रिक्त
* उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

ठाणे: श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असल्याने राज्य शासनातील अनेक अधिकाऱ्यांची एकेकाळी ठाण्यात प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी स्पर्धा लागत असे. मात्र सध्या राजकीय हस्तक्षेप, आतले-बाहेरचे वाद आदी कारणांमुळे हे अधिकारी ठाणे महापालिकेत येण्यास तयार नाहीत, त्यामुळे सहाय्यक आयुक्त पदाच्या चार जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचा ताण इतर अधिकाऱ्यांवर पडत आहे.

ठाणे महापालिकेत सहायक आयुक्त पदाच्या १६ जागा आहेत. त्यापैकी ५०टक्के स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्या जागा भरण्यात आल्या आहेत तर प्रतिनियुक्तीवरील चार अधिकारी सध्या महापालिकेत कार्यरत आहेत आणि चार जागा रिक्त आहेत. राज्य सरकारकडे महापालिकेने प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्तीकरिता पत्रव्यवहार केला आहे, परंतु अनेक अधिकारी ठाणे महापालिकेत येण्यास तयार नाहीत. बदली झाल्याची कुणकुण लागताच ते ठाणे सोडून इतरत्र कुठेही बदली करा अशी विनंती करत असल्याची माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असून स्थानिक अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्तीवरील अधिकारी अशा छुप्या संघर्षाला तोंड द्यावे लागते, असे यापूर्वी येथून बदली होऊन गेलेले अधिकारी सांगतात. त्यांना स्थानिक अधिकारी सहकार्य करत नसल्याने अनेक प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे पाय ठाणे महापालिकेकडे वळत नसल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी उपायुक्त पदाच्या तीन जागा अनेक महिने रिक्त होत्या, त्या जागा मागील महिन्यात भरण्यात आल्या. ते अधिकारी देखिल ठाणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील महापालिका आणि महसूल विभागाचे आहेत. त्यांच्या मुलांच्या शाळा आणि इतर व्यक्तीगत अडचणी यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेची वाट धरल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेची पत घसरली आहे तसेंच राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळेच अधिकाऱ्यांना ठाण्यात यायला भीती वाटते, असे अधिकाऱ्यांच्या संघटनेतील एक पदाधिकारी म्हणाला.