16 हजार कोटींचा गैरव्यवहारात आणखी दोघांना अटक

आतापर्यंत नऊ जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे : पेमेंट गेटवे कंपन्यांचे सॉफ्टवेअर हॅक करून तब्बल 16,180 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळी विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहेत. या हॅकर टोळीतील दोघांना ठाणे सायबर पोलिसांनी सोमवारी अटक केली.

भुपेश दिनेश अग्रवाल (38) बोरिवली, आणि महेंद्र जैन (34) खेतवाडी, फोर्ट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कार्यालय असलेल्या सेफक्सपे या पेमेंट गेटवे कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून काही अज्ञात सायबर चोरट्यांनी कंपनीच्या खात्यातून तब्बल 25 कोटी रुपये वळते केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला होता. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सायबर चोरट्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बालगणेश टॉवर स्टेशन रोड ठाणे या पत्त्यावर बँक दस्तावेज आणि विविध नोटराईज्ड भागीदारी करारनामे बनवल्याचे उघड झाले आहे. मिळून आलेल्या दस्तावेजाच्या पडताळणीतून या सायबर चोरट्यांनी तब्बल 16,180 कोटी 41 लाख 92 हजार 497 रूपयांची फसवणूक केली असल्याचे आढळून आले आहे. या रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठविल्याचे देखील तपासातून समोर आले. या सायबर चोरट्यांच्या टोळीने देशभरातील अनेक बड्या कंपन्यांचे अशाच प्रकारे सॉफ्टवेअर हॅक करून मोठा आर्थिक फ्रॉड केल्याचे या प्रकरणाच्या तपासातून समोर आले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या केदार दिघे (41), संदीप नकाशे (38) राम बोहरा (47) या तिघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच गुरुवारी अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या भुपेश अग्रवाल आणि महेंद्र जैन या आणखी दोघांना ठाणे सायबर सेलच्या पथकाने सोमवारी अटक केली.