दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी ‘माझी लेक’योजनेतून 50 हजार रुपये

ठाणे जिल्हा परिषदेचा निर्णय

ठाणे : दिव्यांग पालकांच्या एक किंवा दोन मुलींच्या भविष्यासाठी व शिक्षण घेण्यासाठी सहाय्य होणे व त्यांचे पुढील जीवन सुखकर होण्यासाठी मुदत ठेव योजनेत पालक व मुलगी यांच्या संयुक्त नावे गुंतवणूक करण्याकरीता ठाणे जिल्हा परिषदने “माझी लेक” या योजनेच्या अंतर्गत ५० हजार रु. मुदत ठेव रक्कम ठेवण्याचा निर्णय घेतला.

योजनेचा कालावधी 01 एप्रिल 2023 ते 31 मार्च 24 या आर्थिक वर्षासाठी करण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदेतर्फे अर्थसंकल्पीय तरतूद 25 लाख रुपये करण्यात आली आहे. सन 2023- 24 मधील पाच टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातील योजना दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी, त्यांच्या भविष्यासाठी माझी लेक योजना राबविण्यात येणार आहे. 1 जानेवारी २०२० रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी अर्ज ग्रामपंचायत/ पंचायत समिती यांच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी केले आहे.