रुग्णाला इंजेक्शन दिले; सुई जांघेतच राहिली

* कळवा रुग्णालयातील प्रकार
* रुग्णाला जे.जे. रुग्णालयात हलवले
* आमदार आव्हाड यांचे ट्विट

ठाणे : ठाणे महापालकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे रुग्णांची हेळसांड अद्याप सुरूच असल्याचा एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली.

या प्रकाराला १६ दिवस होऊनही अद्याप याकडे लक्ष द्यायला डॉक्टरांना वेळ नसल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सुई आतमध्ये राहिली होती,अशी कबुली रुग्णालयाच्या वतीने देखील देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी निष्काळजीपणामुळे एका रात्रीत झालेल्या १८ मृत्यूनंतरही कळवा रुग्णालयाकडून निष्काळजीपणाचे प्रकार सुरूच असल्याने रुग्णांमध्येही भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

एक महिन्यापूर्वी आयमन शेख ही मुलगी उपचार घेण्यासाठी कळवा रुग्णालयात आली होती. यावेळी तिला इंजेक्शन देताना सुई जांघेतच तुटली. मात्र १६ दिवस उलटूनही याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असे ट्विट करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

ती सुई काढण्यासाठी लहानशी सर्जरी करावी लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु त्यासाठी रुग्णालयामध्ये डॉक्टरही नाहीत. आता त्या मुलीचा पाय सुजू लागला आहे. जर त्यात काही बरेवाईट झाले तर त्या मुलीचा पाय कापावा लागेल. इतका निष्काळजीपणा डॉक्टर कसे काय करू शकतात आणि मुख्य म्हणजे इंजेक्शन देत असताना सुई तुटतेच कशी? असे प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहे.

यासंदर्भात कळवा रुग्णालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एक महिन्यांपूर्वी आयमन शेख ही मुलगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिला निमोनिया होता. खूप गंभीर परिस्थीतीत तिला आणण्यात आले होते. सलाईन लावण्यासाठी नस मिळत नसल्याने, तिच्या पायातून सेंट्रल लाईन गाईड वापर करून पायाच्या नसमधून इंजेक्शन देण्यात येत होते. दरम्यान तिच्या शरीरात ती गाईड वायर राहिली. इंटरवेनायल रेडिओलॉजिस्ट आणि कार्डियाक सर्जन नसल्याने तिला जे. जे. रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.