शहरातील रस्ते शंभर टक्के खड्डेमुक्त झाले असले तरी शहरातून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य असते. ते दूर करण्याचा अॅक्शन प्लान महापालिका तयार करत आहे. या मार्गांवरील उड्डाणपुलाचे रस्ते मास्टिक पद्धतीने तयार करून चकचकीत खड्डेमुक्त रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आत्तापासून कंबर कसली आहे.
शहरात मजबूत रस्त्यांचे जाळे उभारताना दुरूस्तीनंतरही वारंवार खड्डे पडणारे ब्लॅक स्पॉट शोधण्याचे काम सुरू झाले आहे. हे रस्ते पालिकेच्या अखत्यारीत असो वा नसो, त्याच्या मजबुतीकरणासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते दुरुस्तीचे काम हाती न घेता शक्य तितक्या लवकर ते मार्गी लावण्याचा मानस आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत शहरात महापालिकने ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून २८२ रस्त्यांची कामे सुरु केली. पावसाळयापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा दावा होता. मात्र रस्ते दुरुस्ती अंतिम टप्प्यात असतानाच पावसाचे आगमन झाले आणि ही मोहिम ८० ते ९० टक्क्यांवर येऊन थांबली. या उर्वरित रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांनी १५ डिसेंबरची मुदत दिली आहे.
दरम्यान या रस्ते दुरुस्तीमुळे ठाणेकरांना दरवर्षी सहन कराव्या लागणारा त्रास यंदा कमीच जाणवला. विशेष म्हणजे दुरुस्त झालेल्या रस्त्यांवर खड्डा पडला नाही. असे असले तरी ठाणेकरांना अजुनही शंभर टक्के खड्डेमुक्ती मिळालेली नाही.
मुंबईहून नाशिक किंवा पुण्याकडे जाणार्या वाहनांना ठाणे शहरातून जावे लागते. या मार्गावर असलेले रस्ते आणि बहूतेक उड्डाणपूल हे एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएच्या अख्यारित येतात. त्यापैकी कॅडबरी उड्डाणपूल, नितिन कंपनी, माजिवडे, मानपाडा उड्डाणपूल, घोडबंदर मार्ग आदी ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतातच हा आतापर्यंतचा अनुभव आहे. कितीही डागडुजी केली तरी खड्डे जैसे थे राहत असल्यामुळे दर पावसाळ्यात वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण समस्या सुटत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीच या ‘ब्लॅक स्पॉट’ची दखल घेत दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्या-त्या संस्थांबरोबर पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी रस्ते चांगले केले नाही तर महापालिका त्या रस्त्यावर मास्टिकचा उपचार केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये ज्या रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात, अशा रस्त्यांची यादी तयार करण्यास आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले आहे. त्यासाठी निधीची तरतूद करून रस्ते दुरुस्तीची कामे नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत हाती घेण्याचे नियोजन आहे.
जे रस्ते शासनाच्या अखत्यारित आहेत, त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही त्या संबंधित प्राधिकरणाची आहे. पण जर या यंत्रणा लक्ष देत नसतील तर ती कामे पालिकेलाच हाती घ्यावी लागणार आहेत. त्याचा भार पालिकेला सहन करणे सध्या तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यासाठी संबंधित प्राधिकरणांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
कारणांचा घेणार शोध
केवळ खड्डे बुजवणे किंवा मजबूत करणे हा त्यामागचा हेतू नाही. किंबहूना या रस्त्यांची दुरुस्ती केल्यानंतरही तेथे खड्डे का पडतात याचे कारण शोधणे गरजेचे आहे. खड्ड्यांची कारणे निकाली काढणे आणि त्यानुसार दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.