कोणत्या आपणाला जाऊ दादा?

’दादा, कोणत्या सभेला जाऊ रे?’ तीने काकुळतीने प्रश्न विचारला. दरवर्षी, अगदी वर्षानुवर्षे ती न चुकता मोठ्या साहेबांचे विचार ऐकायला जात असे. भाषण ऐकून घरी परतताना तिच्या अंगावर मूठभर मासही वाढत असे. कानाचे रान करुन ऐकणं काय असतं हे तिला चांगले ठाऊक होते. विशेष म्हणजे तिचा उल्लेख केल्याशिवाय या सभा पूर्णही होत नसत आणि म्हणुनच वर्षातून एकदा होणारी तिची आठवण तिला सुखावून जात असे. हे सुख नेमक्या कोणत्या सभेत मिळेल हा रोख तिच्या प्रश्‍नात होता.
-अगं असं काय करतेस, तुझ्याशिवाय दोन्ही सभांतील दोन्ही नेत्यांचे पान हलणार नाही. तुला जिथे जायचे तिथे जा. तुझी निराशा होणार नाही.’ मी तिचा गोंधळ दूर करण्यासाठी बोललो.
-‘हे बरंय दादा, मी एकाचवेळी दोन सभांना कशी जाऊ शकेन? तू पत्रकार आहेस. नि:पक्षपणे उत्तर दे .की तूही बिघडला आहेस या नेत्यांबरोबर दिवस-रात्र राहून.’ आता मात्र ती थोडी नाराज झाल्याचे मला जाणवत होते. तिची उगाच थट्टा केली असे मला वाटून गेले.
-हे बघ ताई, माझा हेतू तुला नाराज करण्याचा नव्हता की थट्टा करण्याचा. तुझी पुरेशी थट्टा तुझ्याच नेत्यांनी केली आहे. आम्ही कोण पामर तुला दु:ख देणारे? – मी समजुतदारपणाचा सूर आळवीत म्हणालो.
– शिवतीर्थावर जाईन म्हणते. तो सवयीचा भाग बनला आहे ना. तुम्हा पत्रकारांच्या भाषेत बोलायचे तर तो माझ्या ’डीएनए’चा भाग बनला आहे.’
ताईने निर्णय घेतलाच होता तरी मग तिच्या मनात गोंधळ का असावा? या शंकेच्या आधारे मी खुलासा मागितला.
– ’अगं ठरवलंच होतंस तर मला का विचारतेस?’ -मी थोडा वैतागूनच बोललो.
– तसं नाही रे, पण वाघ आणि धनुष्यबाणाचे चिन्ह तिथे आझाद मैदानात असणार. मला त्यामुळे तेही ’होम-पिच’ वाटते. हा गोंधळ कसा दूर करायचा?
ताईचा युक्तीवाद पटणारा होता.
– ‘अगं, असेल दोघांपैकी कोणी विराट की रोहित पण विचारांच्या खेळपट्टीवर कोण चौकार, षटकार मारतो हे महत्त्वाचे आहे.’
माझ्या या प्रतिक्रियेमुळे तर ताई अधिकच गोंधळली.
– ‘तू म्हणतोस तेही बरोबर आहे. अलिकडे मॅच-फिक्सिंगचे प्रमाणही वाढले आहे. पवार नावाच्या गोलंदाजाने टाकलेल्या एकाने विकेट फेकला तर नागपूरच्या गोलंदाजाच्या गुगलीवर हे गाडले!त्यामुळे जिंकलेला ’सामना’ हातची गेला. मला माझीच काळजी वाटू लागली.
ताईने क्रिकेटची परिभाषा वापरुन पुन्हा एकदा शिवाजीपार्क की आझाद मैदान हा गोंधळ सुरुच ठेवला.
– ‘मॅच-फिक्सिंग तर जुने झाले ताई. अगं आता तर प्रतिस्पर्धी संघालाच विकत घेऊन जिंकण्याची रीत सुरु झाली आहे. तू पाहिलंस ना कशा १०ः१० षटकांच्या मॅचेस सुरु झाल्या आहेत. अजित वाडेकर ते अजित…असा प्रवास सुरु आहे.
-मी माझ्या वतीने भर घातली.
– ‘हो ना, मलाही हे कळत नाही की पूर्वी एक कर्णधार असे आणि एक उपकर्णधार. आता दोन-दोन उपकर्णधार का ठेवावे लागतात?’ ताईचा प्रश्न भाबडा होता. म्हणजे तिच्यावर भोवताली सुरु असलेल्या राजकीय प्रदूषणाचा परिणाम झाला नसावा.
-‘अगं, हे तर काहीच नाही. प्रत्यक्षात कोण कर्णधार आणि कोण उपकर्णधार याबद्दलही गोंधळ आहे.’ माझीही प्रतिक्रिया तिला बहुधा समजली नसावी. फोनवरचा पॉज़ बरेच काही सांगून गेला होता.
-‘आझाद मैदानावर भले वाघ आणि धनुष्यबाण पहायला मिळाले तरी शिवाजीपार्कची सभा संपल्यावर चौपाटीवर जाऊन भेळ-पाणीपुरी खाण्याचा आनंद काही औरच असतो.’ ताईच्या मनात पार्कातील सभेने घर केले असल्याचे जाणवले.
-‘तेही खरेच, पण का गं, तुझा उल्लेख झाल्यावर तुझे पोट भरत असेल नाही? आणि काय गं, दसरा मेळावे भेळ खाण्यासाठी असतात की विचाराचे सोने लुटण्यासाठी?’ -मी
-‘अर्थातच विचाराचे सोने! पण अलिकडे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची फॅशन आली आहे. मी तर बाई आर्ट-ज्वेलरीच घालणे पसंत करते.’ – ताईने सोन्याचा विषय तिच्या पद्धीने टोलावला.
– ‘मला खरं सांग बरं एकदा, की तुला नेमके कशासाठी जायचे आहे सभेला? भेळ खायला. सोनं लुटायला, की धनुष्यबाण पहायला? की तुझा उल्लेख होतो तो ऐकायला?’
– ‘माझे उत्तर तुझ्या शेवटच्या प्रश्नात आहे.’ -इति ताई
– ‘मग माझं ऐक. तू घरी बसून दोन्ही सभांना हजेरी लाव.’ -मी प्रामाणिक सल्ला दिला.
– ‘का रे दादा?’
– ‘मला भीती वाटतेय की यंदा तुझा उल्लेख होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. उगीच जीवाचा आटा-पिटा करीत सभेला जाशील आणि पदरी तुझ्या निराशाच पडायची.’ – मी धीर करुन वास्तव सांगूनच टाकले.
– ‘तुला असं म्हणायचंय का दादा की माझा उल्लेख कोणीच करणार नाही?’ ताईचा स्वर कातर झाला होता.
– ‘हो.’ हे उत्तर देताना मी छातीवर धोंडा ठेवला होता. ताईचे भाबडेपण सभेत झडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत धारातीर्थी पडू नये हीच इच्छा होती.
ताईने फोटो ठेवताना एकच वाक्य म्हटले आणि आझाद मैदानावरील वाघाची डरकाळी आणि शिवाजीपार्कजवळील उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा काय आवाज करतील इतका मोठा आक्रोश माझ्या कानात झाला.
– दादा तू एव्हाना मला ओळखले असशील ना? मी मराठी माणसाची अस्मिता. खरंच का रे मी कायमची पोरकी झाली होणार का रे दादा?’