ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाच्या जाहिरात कमानी

ठाणे: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चंदनवाडी या बालेकिल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवरात्रौत्सवानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जाहिरात कमानी उभारण्यात आल्या असून शहरात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक विकास दाभाडे, किरण खोपडे यांनी या कमानी उभारून ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन शिवसेना अस्तित्वात आल्या. ठाणे शहरातील शिवसेनेचे ६३ नगरसेवक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासोबत गेले तर उरलेले श्री ठाकरे यांच्यासोबत राहिले. अनेक शाखा प्रमुख देखिल शिंदे यांच्या सोबत गेले होते. शिवसेनेच्या शाखांवरून दोन गटात वादही झाले होते, परंतु चंदनवाडी येथील शिवसैनिक आणि शाखाप्रमुख आज देखिल श्री. ठाकरे यांच्या गटात कायम आहेत. या शाखेच्या माध्यमातून शिवसैनिक विविध कार्यक्रम राबवत आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा केला जातो. त्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा बॅनर आणि कमानी उभारल्या जातात. या ठिकाणी शिंदे गटाचे बॅनर लावले जात नाहीत. परंतु गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव दरम्यान श्री. दाभाडे आणि श्री. खोपडे यांनी अल्मेडा मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा देणाऱ्या कमानी उभारल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या दरम्यान कमान उभारण्यासाठी काही लोकांनी विरोध केला होता परंतु तो विरोध झुगारून श्री. दाभाडे यांनी कमान लावली तसेच आत्ता नवरात्रौत्सवात देखिल कमान लावली आहे त्यावेळी मात्र कोणीही विरोध केला नाही परंतु ठाकरे यांच्या बालेकिल्यात कमान उभारल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

या बाबत ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उगाच वाद नको म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही. या भागातील शिवसैनिक निष्ठावंत आहेत. कमान उभारून काही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.