कळवा पूर्वेत दरमहा पाण्यासाठी उकळली जाते ४० लाखांची खंडणी

* राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा आरोप
* कळव्यात पाण्यावरून आव्हाड विरुद्ध मुल्ला वाद पेटणार

ठाणे: स्थानिक लोकप्रतिनिधींचे १६ गुंड कळवा पूर्व येथील लोकांकडून दर महिन्याला ३० ते ४० लाखांची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कळवा पूर्व येथील लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी तक्रारी केल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची माणसे प्रत्येक कुटूंबाकडून बोअरवेलच्या पाण्यासाठी ५०० रुपये गोळा करत असतात अशी माहिती या रहिवाशांनी दिली. याबाबत पोलिसांकडे शहनिशा केल्यानंतर पोलिसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे १६ गुंड दर महिन्याला लोकांकडून ३० ते ४० लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती मिळाली. ही खंडणी वसूल करणार्‍यांची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचेही नजीब मुल्ला यांनी संकेत दिले.

कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोनेश्वर नगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २४० कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत. या अमृत योजनेतून कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावणार आहोत, ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली १४ वर्षे शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व येथील नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला.

गेली १४ वर्षे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पूर्व नागरिकांसाठी प्रत्यक्षात काहीही केलेले नाही.आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस भास्कर नगर, पौड पाडा, आतकोनेष्शर इथला पाणी प्रश्नावर मार्ग काढत असताना हंडा मोर्चा काढून दिखाव्याचे राजकारण फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.