अंबरनाथ: भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन युवक जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्रीच्या सुमाराला अंबरनाथमध्ये घडली.
मानव थारवानी (१८) आणि कौशल थावनी (१६) हे दोघे उल्हासनगरचे रहिवासी कल्याण-बदलापूर महामार्गावरून बदलापूरच्या दिशेने मंगळवारी मध्यरात्री कारमधून निघाले होते. मानव थारवाणी कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डीमार्ट परिसरात रस्त्याच्या झाडाला धडकली. झालेल्या अपघातात दोघेही जागीच मरण पावले.
अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.