ठाणे, डोंंबिवली, कल्याण, टिटवाळा, वसईतही परवडणारी म्हाडाची घरे

Thanevaibhav Online

17 October 2023

ठाणे, डोंंबिवली, कल्याण, टिटवाळा आणि वसईतही परवडणारी म्हाडाची घरे दहा लाखांपासून 42 लाखांच्या किंमतीत मिळणार असून, या घरांचा 26 ऑक्टोबर रोजी सोडतीत समावेश केला आहे. ही सर्व घरे म्हाडा कोकण मंडळाच्या ऑक्टोबरमधील सोडतीतील आहेत.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे पावणेपाच हजार घरांसाठी 26 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत परवडणारी घरी उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सोडतीत नऊ लाख 89 हजार रुपयांपासून 42 लाख रुपये किमतीच्या घरांचा समावेश करण्यात येणार आहे तसेच त्यात 20टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांचा समावेश आहे.

कोकण मंडळाच्या 10 मे रोजीच्या सोडतीत विक्री न झालेल्या तसेच विविध योजनातंर्गत उपलब्ध झालेल्या घरांसाठी २६ ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीच्या वेळापत्रकाला अंतिम वेग देण्यातआला असून, यावेळी पत्रकानुसार 11 सप्टेंबर रोजी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याच दिवसापासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. आता या सोडतीतील घरांच्या किंमतींची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार सोडतीत नऊ लाख 89 हजार 300 पासून ते 42 लाख रुपये किमतींच्या घरांचा समावेश आहे
या सोडतीत पनवेलमधील गोदरेज प्रकल्पमधील 20टक्के योजनेतील 417 घरांना, डोंबिवलीतील ऋणवाल प्रकल्पातील 621 घरांना सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. गोदरेज प्रकल्पातील घरांच्या किमती अद्याप निश्चित झाल्या नाहीत. रुणवाल प्रकल्पात अत्यल्प गटासाठी 213 घरे आहेत. ही घरे 27.20 चौरस मीटर, 27.48 चौरस मीटर आणि 27.20 चौरस मीटर क्षेत्रफळाची आहेत.

या घरांच्या किमती अनुक्रमे 13 लाख 91 हजार, 14 लाख 14 हजार 600 आणि 14 लाख 29 हजार रुपये अशा आहेत. अल्प गटातील 408 घरे सोडतीत समाविष्ट आहे. या घरांचे क्षेत्रफळ 43.74 ते 43.82 चौरस मीटर इतके आहे. या घरांच्या किमती 22 लाख 74 हजार आणि 22 लाख 82 हजार 100 आणि 22 लाख 37 हजार 600 व 22 लाख 42 हजार 200 रुपये अशा आहेत.

वसईतील मौजे गोखिवरे येथील घर अत्यंत सर्वात स्वस्त असून त्या घरांची किंमत नऊ लाख 89 हजार 300 रुपये आहे. मात्र ही घरे स्वस्त असलीतरी येथे दोनच घरे उपलब्ध आहेत. सर्वाधिक महागडी घरे म्हाडा योजनेतील आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही घरे विरार, बोळींजमधील असून या घरांची किंमत 41 लाख 81 हजार रुपये इतकी आहे.