Thanevaibhav Online
17 October 2023
पनवेलः १४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित नवी मंबई मेट्रो रेल्वेचे उद्घाटन होईल अशी चर्चा होती. मात्र आता २६ ऑक्टोबर ही नवीन तारीख सरकारी प्रशासनाच्या अधिका-यांसमोर आली आहे.
२६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी थेट येणार आहेत. याचवेळी ते मेट्रो रेल्वेचे उदघाटन करुन त्यावेळी मेट्रोची सफर करतील असे नियोजन केले जात आहे. अद्याप या नवीन तारखेविषयी सरकारी प्रशासनातील अधिका-यांनी कोणताही दुजोरा दिला नसला तरी खासगीमध्ये अधिकाऱ्यांना या तारखेला निश्चित तारीख समजून नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
बेलापूर ते पेणधर या मार्गावर नवी मुंबई मेट्रो रेल्वे धावणार आहे. मागील १० वर्षांपासून या रेल्वेचे काम सुरु होते. ३०६३ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च केले जाणार होते. त्यापैकी २९५४ कोटी रुपयांत या मेट्रोसाठी खर्च केला गेला आहे. ९८ हजार प्रवाशांना या मेट्रोसेवेचा लाभ होणार आहे. नवी मुंबई मेट्रो असे नाव या प्रकल्पाचे असले तरी प्रत्यक्षात बेलापूर, खारघर आणि तळोजा वसाहत या दरम्यानच्या प्रवाशांना या सेवेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. गारेगार प्रवास १० ते ४० रुपयांमध्ये प्रवाशांना करता येणार आहे. खारघरवासियांचे मागील पाच वर्षांपासूनचे स्वप्न या सेवेमुळे पुर्ण होणार आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे या रेल्वेतून प्रवास करतील अशी अपेक्षा खारघरच्या नागरिकांना आहे.