Thanevaibhav Online
17 October 2023
सुरेश सोंडकर/ठाणे
मेट्रोच्या कामांमुळे घोडबंदर मार्ग आधीच अरुंद झाला असून वाहनेही सुसाट धावत आहेत. अशात वाहतूक पोलीस अचानक अवजड आणि हलक्या वाहनांना तपासणीसाठी थांबवत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे.
घोडबंदर मार्गावरून गुजरात आणि ठाण्याकडे जाणाऱ्या येणाऱ्या जड-अवजड वाहनांची वर्दळ २४ तास असते. सध्या मेट्रोची कामे सुरू असल्याने पत्रे उभारण्यात आले असून दोन्ही मार्गिकांची रुंदी निम्म्याने कमी झाली आहे. त्यातून या वाहनांना विशेषतः दोन आणि तीन चाकी वाहनांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या मार्गावर रोज लहान-मोठे अपघात होऊन जीवितहानी होत आहे.
अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस बजावत असलेले ‘कर्तव्य’ वाहन चालकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. समृद्धी महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पोलिसांनी तपासणीसाठी अचानक ट्रक थांबवल्याने मागून वेगाने येणारी बस त्यावर आदळली. या अपघातात १२ जणांचा नाहक बळी गेला. घोडबंदर मार्गावरही वाहतूक पोलीस अरुंद मार्गिकांवर वाहनांना अचानक थांबवत असल्याने या मार्गावरही समृद्धीची उजळणी होण्याची दाट शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांनी एखादे वाहन तपासणीसाठी थांबवताना मागून येणाऱ्या वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ वसुलीसाठी वाहने अचानक थांबवून नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, असे ठाणेकर नागरिक बोलत आहेत.
या मार्गावर गायमुख, मानपाडा, कापूरबावडी आदी ठिकाणी वाहनांची प्रचंड कोंडी दररोज होते. ही कोंडी सोडवण्यासाठी येथे एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसत नाही. मात्र अन्य ठिकाणी गटागटाने उभे राहून वाहने थांबवत दंड वसुली करताना पोलीस दिसत असतात. वाहन चालकांना शिस्त लावणे आवश्यक असले तरी वाहतूक नियमन देखील आवश्यक असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.