भारत विरुद्ध पाकिस्तान: आज होणार विश्वचषकाची खरी घटस्थापना

Photo credits: AFP & ICC Cricket

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १२ वा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल.

भारत आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि पाकिस्तान १९७८ पासून एकमेकांविरुद्ध १३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने ५६ जिंकले आहेत, पाकिस्तानने ७३ जिंकले आहेत, तर पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, या दोन संघांनी १९८३ ते २०१३ दरम्यान ३० एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने ११ जिंकले आहेत आणि पाकिस्तानने १९ जिंकले आहेत. विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि पाकिस्तान १९९२ ते २०१९ दरम्यान सात वेळा आमनेसामने आले आहेत, आणि सर्व सात वेळा भारत जिंकला आहे.

  भारत पाकिस्तान
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) ५६ ७३
भारतात (विजय) ११ १९
विश्वचषकात (विजय)

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी

भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या मोहिमेला दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना (६ विकेट्सने) चेन्नई येथे आणि दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध (८ गडी राखून) दिल्ली येथे जिंकला, तर दुसरीकडे पाकिस्तानने नेदरलँड्स (८१ धावांनी) आणि श्रीलंकेचा (६ विकेट्सने) पराभव हैदराबाद येथे केला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

दुखापती अपडेट्स

डेंग्यूने त्रस्त असलेला भारताचा प्रतिभावान सलामीवीर शुभमन गिल पहिले दोन सामने खेळू शकला नाही. तो अहमदाबादला आपल्या संघाबरोबर आला असला आणि सराव सत्राचा भाग जरी होता, तरीही तो खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही याबद्दल शंका आहे. पाकिस्तानसाठी, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शतकवीर मोहम्मद रिझवान काहीशा अस्वस्थतेत दिसला. रिझवानशिवाय पाकिस्तान संघात दुखापतीची भीती नाही.

खेळण्याची परिस्थिती

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. भारत येथे त्यांचा १९वा एकदिवसीय सामना खेळणार आहे, ज्यामध्ये त्यांनी १० जिंकले आहेत आणि आठ गमावले आहेत, तर पाकिस्तान २००५ मध्ये भारताविरुद्ध पहिला विजय मिळवून येथे त्यांचा दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या विश्वचषकातील दुसऱ्या सामन्याचे आयोजन या ठिकाणी केले जाईल. येथे खेळला गेलेला पहिला सामना उच्च धावसंख्येचा होता ज्यामध्ये ५५० हून अधिक धावा झाल्या होत्या. अजून एका धावांच्या मेजवानीची अपेक्षा आहे.

हवामान

हवामान मुख्यतः गरम असेल अशी अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन १४% असेल आणि १% पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-वायव्येकडून वारे वाहतील.

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

भारतीय संघाचा फलंदाजीमधला एक अविभाज्य भाग म्हणजे विराट कोहली. कोहली वर सगळ्यांची नजर असेल. त्याने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात एका पाठोपाठ एक अर्धशतके मारून केली आहे. पाकिस्तानविरुद्ध, त्याला त्याच्या एकदिवसीय शतकांच्या ४७ च्या संख्येत भर घालायची घालायची पूर्ण इच्छा असेल. कर्णधार रोहित शर्मा देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मागच्याच सामन्यात त्याने एक सुंदर शतक आपल्या नावावर केले. त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये, जसप्रीत बुमराह हा भारतासाठी खूप मोठा प्लस पॉईंट ठरला आहे. त्याने दोन सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत. नवीन चेंडूने आणि डावाच्या शेवटी देखील त्यानी चांगली गोलंदाजी केली आहे.

पाकिस्तानसाठी, मोहम्मद रिझवान, ज्याने आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतकीय पारी खेळून आपल्या संघाला एक रेकॉर्ड चेस साकार करायला मदत केली. जर तो तंदुरुस्त असेल आणि खेळासाठी उपलब्ध असेल तर त्याच्याकडून पुन्हा चांगली फलंदाजी करणे अपेक्षित असेल. याशिवाय कर्णधार बाबर आझम, ज्याने अद्याप मोठी धावसंख्या केली नाही, तो भारताविरुद्ध आपला हरवलेला फॉर्म परत आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. गोलंदाजीत, शाहीन शाह आफ्रिदीकडून आक्रमणाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा असताना, हसन अली आणि हरिस रौफ यांनी अनुक्रमे सहा आणि पाच बळी घेऊन आता पर्यंत अविश्वसनीय कामगिरी केली आहे.

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १४ ऑक्टोबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)