आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर १० ऑक्टोबर रोजी १९९२ विश्वचषक विजेता पाकिस्तान आणि १९९६ विश्वचषक विजेता श्रीलंका यांच्यात खेळवला जाईल.
पाकिस्तान आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी १९७५ पासून एकमेकांविरुद्ध १५६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी पाकिस्तानने ९२ जिंकले आहेत तर श्रीलंकेने ५९. उर्वरित पाच सामन्यांपैकी एक टाय झाला आणि बाकी चार सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. भारतात या दोन संघांनी सात सामने खेळले असून चारमध्ये पाकिस्तानने तर तीनमध्ये श्रीलंकेने विजय मिळवला आहे. एकूणच रेकॉर्ड पाकिस्तानच्या बाजूने आहेत आणि विश्वचषकांत देखील पाकिस्तानचे वर्चस्व कायम आहे. या महास्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सात सामन्यांपैकी सर्व पाकिस्तानने जिंकले आहेत.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील पाकिस्तान आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात प्रत्येकी एक सामना खेळला गेला आहे. पाकिस्तानने हैदराबाद येथे नेदरलँड्सवर २८६ धावा केल्यानंतर ८१ धावांनी विजय मिळवून सकारात्मक सुरुवात केली आहे, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. ४२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दिल्ली मध्ये करताना श्रीलंकेला १०२ धावांनी हार स्वीकारावी लागली.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसुन रजीथा, मथीशा पथीराना, दिलशान मधुशंका, दुषण हेमंता.
दुखापती अपडेट्स
श्रीलंकेचा फिरकीपटू महीष थीकशाना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. जर हा ऑफ स्पिनर दुखापतीतून सावरला असेल तर तो थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करेल यात शंका नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचा पूर्ण संघ श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल.
खेळण्याची परिस्थिती
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या मैदानावर दोन्ही संघांचा दुसरा सामना होणार आहे. श्रीलंकेने खेळलेला पहिला सामना गमावला आहे, तर पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच येथे यशाची नोंद केली आहे. या विश्वचषक स्पर्धेतील तिसरा सामना या ठिकाणी होणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये फलंदाजांनी भरभरून धावा केल्या, त्यामुळे आणखी एक धावांच्या मेजवानीची अपेक्षा आहे.
हवामान
हवामानात धुके सूर्यप्रकाश दिसण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन १८% आणि पावसाची शक्यता २% असेल. पूर्व-ईशान्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
पाकिस्तानसाठी, नेदरलँड्सविरुद्धच्या मागील सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या सौद शकीलकडून श्रीलंकेविरुद्धच्या पुढील सामन्यात पुन्हा एक चांगली कामगिरी अपेक्षित आहे. या २८ वर्षीय डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने ५२ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह ६८ धावा केल्या. गोलंदाजीत उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज हारिस रौफ नेदरलँड्सविरुद्धच्या मागील सामन्यात सर्वात यशस्वी ठरला. चांगल्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या या २९ वर्षीय खेळाडूने नऊ षटकांत ४३ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेसाठी, कर्णधार दासुन शनाकाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात सुंदर प्रदर्शन केले. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने ६२ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ६८ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने उजव्या हाताच्या मध्यम गतीची सहा षटकेही टाकली आणि एक अस्सल अष्टपैलू म्हणून त्याची योग्यता सिद्ध केली. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेसाठी मागील सामन्यात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा चारिथ असलंका सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या २६ वर्षीय डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने ६५ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह ७९ धावा केल्या.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १० ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)