हिटमॅनचं १२ वर्षांचं स्वप्न !!!

Photo credits: ICC

रोहित शर्मा २००७ च्या T-20 विजेत्या विश्वचषक संघातला सर्वात युवा खेळाडू होता. २००६ मध्ये १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर २००७ च्या तरूणांचा भराणा असलेल्या संघामध्ये तो होता. विश्वचषकाच्या अखेरच्या टप्प्यात त्याला दिनेश कार्तिकच्या एवजी संधी मिळाली आणि त्याने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये त्याने सचिन तेंडूलकर बरोबर केलेली भागिदारी भारताला विजेतेपज देऊन गेली. पण त्यानंतर ते २०११ च्या विश्वचषकाच्या कालावधीमध्ये रोहितचा फॉर्म खराब राहीला, वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीला येत राहील्याने लय सापडत नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून विश्वचषकाच्या संघामधला त्याचा पत्ता शेवटच्या क्षणी कट झाला. ती सल त्याने कायम बोलून दाखवली आहे. २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघांचा भाग न राहता येणं हा त्याच्या कारकिर्दिमधला सगळ्यात वाईट अनुभव आहे. २०१५ आणि २०१९ ला रोहितने खूप प्रयत्न केले विजेतेपद मिळवण्याचे. २०१९ मध्ये तर त्याने ९ साखळी सामन्यांमध्ये ५ शतके झळकावली. तरी शेवटी विजेतेपदाने त्याला हुलकावणीच दिली. दिनेश लाड या बोरिवलीच्या प्रशिक्षकानी रोहितला खेळताना बघितलं आणि त्याची फिरकी गोलंदाजी त्यांना उपयुक्त वाटली. त्यासाठी त्यांनी रोहितला बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेमध्ये प्रवेश घ्यायला लावला आणि सगळा सोय करून दिली. एकदा दिनेश लाड सरावासाठी उशीरा आलेले असताना रोहितला त्यांना बॅटिंग कराना बघितलं आणि त्यांना नैसर्गिक गुणवत्ता दिसली. भरपूर मेहनत त्याच्या फलंदाजीच्या सरावावर घेण्यात आली आणि नंतर विविध वयोगटाच्या स्पर्धांमध्ये तावन सुलाखून तो निघाला. २००६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये भारत थोडक्यात हरला असला तरी पुजारा, रोहित यासारख्या खेळाडूंनी नंतर मागे वळून बघितलं नाही.

२०२३ चा विश्वचषक टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेपॉक स्टेडियमवर खेळून सुरूवात करणार आहे. ५० षटकांचा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न घेऊन क्रिकेट खेळायला सुरू केलेला रोहित शर्मा कर्णधार असणार आहे आणि पूर्ण ताकदीने राहीलेलं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. सामन्यासाधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही त्याच्या बोलण्यातून तेड जाणवत होतं. सगळे खेळाडू फिट आहेत, प्रत्येकाला आपापल्या रोलची क्लॅरिटी आहे. आता फक्त थोड लक पण आमच्या बाजूला असेल तर आम्ही नक्की १९ नोव्हेंबरला कप आमच्या नावावर करू. माझ्या लेखी ५० षटकांचं क्रिकेट आणि त्याचा विश्वचषक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो जिंकण्याची मी आतुरतेने वाट बघतोय हे त्याने पुन्हा पुन्हा ठासून सांगितलं.

रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कलाटणी मिळाली ती २०१३ च्या चॅँपियन्स ट्रॉफीमध्ये. रोहित पूल आणि हूकचे फटके चांगले मारतो आणि इंग्लंडमध्ये त्याचा सलामीला उत्तम उपयोग होईल असा हिशोब होता. सेहवाग, सचिन, गंभीर यांच्यानंतर सलामीची जोडी स्थिरावत नव्हती. रोहितसाठी तोच टर्निंग पॉइंट होता. त्याने आणि शिखर धवनने ती स्पर्धा गाजवली आणि तेव्हापासून या दोघांची जोडी शुभमन गिलची दीड वर्षापूर्वी येईपर्यंत अव्वल होती. तीन डबल सेंचुरी केलेला तो जगातला एकमेव खेळाडू आहे. भरात असताना रोहितला खेळताना बघणं हा निखळ आनंद आहे. त्याचे सगळे फटके हे तंत्रशुद्ध आहेत. त्याने मारलेले षटकारही ओढून ताणून मारलेले वाटत नाहीत. जास्तीत जास्त सरळ खेळून धावा कशा करता येतील यावर त्याचा फोकस असतो. हूक आणि पूल हा भारतीय खेळाडूंचा कच्चा दुवा. पण रोहितची या दोन्हींवर जबरदस्त पकड आहे. युवराज सिंग हा रोहित शर्माचा खास दोस्त. रोहितने शिताफिने मारलेले षटकार फॉर्ममध्ये असणा-या युवराजची आठवण करून देतात. सध्यातरी टीममध्ये रोहितसारखा षटकार मारणारा दुसरा खेळाडू नाही. रोहितने जेव्हा सेंचुरी केल्या आहेत तेव्हा त्याने प्रयत्नपूर्वक मोठ्या खेळी साकारल्या आहेत. तेवढी एकाग्रता आणि आक्रमकता दोन्ही ५० षटकांसाठी ठेवणं हे एखाद वेळी जमू शकतं. पण तीन वेळा ती गोष्ट करणं याचा अर्थ खेळाचं बेसिक प्रचंड मजबूत असण्यामध्ये आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इडियन्सकडून खेळताना फलंदाज म्हणून रोहितचा फॉर्म गेली काही वर्ष ठीक नाही. पण कर्णधार म्हणून त्याची कामगिरी उत्तम झाली आहे. मुंबई इंडियन्स गेली दोन वर्ष युवा खेळाडूंचा भराणा असलेला संघ उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. रोहितने २०१५ ते २०१९ हीच प्रक्रिया यशस्वी पद्धतीने केली होती. त्याने भारतीय संघालाही चांगले खेळाडू मिळाले. पण २० षटकांच्या क्रिकेटमध्ये आंततराष्ट्रीय क्रिकेट रोहित यापुढे खेळेल का यावर प्रश्नचिन्ह आहे. अर्थात आत्ता तरी सगळं लक्ष १९ नोव्हेंबर २०२३ कडे आहे. त्यादिवशी रोहितच्या हातात ट्रॉफी असमावी अशी सर्व देशाची इच्छा आहे.

 

आदित्य जोशी

टीम स्पोर्ट्स कट्टा

क्रीडा विश्लेषक