‘रेवस-करंजा’ तर सेवेच्या वाढीव भाड्याला त्वरीत स्‍थगिती द्या

Thanevaibhav Online

22 September 2023

ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनची मागणी

नवी मुंबई: मागील आठवड्यापासून रायगड जिल्ह्यातील ‘रेवस-करंजा’ या दीड ते पावणे दोन किमीच्या जलमार्गावर चालणाऱ्या तर सेवेच्या (छोटी बोट) भाड्यात ५० टक्क्यांनी वाढ करत २० रुपयांवरून एकदम ३० रुपये केली आहे.

या मार्गावर रोज दीड ते अडीच हजार प्रवासी नियमितपणे प्रवास करतात. त्यामुळे या भाडेवाढीमुळे अधिक भुर्दंड बसत आहे. या भाडेवाढीला त्वरीत स्थगिती द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाचे बंदरे व वाहतुक विभागाचे प्रधान सचिव पराग जैन व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे (एमएमबी) मुख्य कार्यकारी अधिकारी मणिक गुरसळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
रेवस-करंजा तर सेवेने अलिबाग व उरण हे दोन तालुके थेट जोडले आहेत. अलिबाग मुरुड तालुक्यातील प्रवाशांना उरण, नवी मुंबई, ठाणे, मुंबईला जाणारा हा जवळचा आणि सुलभ मार्ग आहे. उरण तालुक्यातून जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग येथे शासकीय व खाजगी कार्यालये गाठण्यासाठी ही तरसेवा फायदेशीर व वेळ वाचविणारी ठरते. भाजीपाला, फळफळावळ व अन्य व्यापारातील विक्रेत्या महिला व विक्रेते पुरुष यांची देखील या मार्गावर वाहतूक लक्षणीय आहे. मात्र सेवेत अचानक भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या भाडेवाढीचा फटका या घटकांबरोबरच समाजातील सर्व थरातील नागरिकांना बसत आहे.

या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन ही भाडेवाढ रद्द करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी बंदरे आणि वाहतूक विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसाळ यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांचेमार्फत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात येत होता. मात्र दरवेळी रु. २ ते ४ च्या वर कधीच भाडेवाढ झाली नाही. आता मात्र आता थेट ५० टक्के भरमसाठ भाडेवाढ केल्याने प्रवासी कोंडीत सापडले आहेत.