ठामपाकडून १७ हजार महिलांचे ‘कल्याण’

Thanevaibhav Online

22 September 2023

उदरनिर्वाहासाठी २४ कोटींचा निधी बँक खात्यात

ठाणे: ठाणे शहरातील गरीब, गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जात असून तब्बल १७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे.

कचरावेचक महिला, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिला, कर्त्या पुरुषाचे तसेच पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन तसेच ६० वर्षीय महिलांच्या उदरनिर्वाहासाठी हा निधी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दिला जातो.

ठाणे महापालिकेच्या वतीने सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण योजनेकरीता तरदुत करण्यात आली होती. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महिलांच्या योजनेमधील निधी वाटपासाठी सहा महिने उशीर झाला होता. पालिकेच्या महासभा ठरावानुसार फक्त ८,२७३ महिलांना आर्थिक लाभ मिळणार होता. मात्र सरसकट महिलांना लाभ देण्याचा निर्णय झाल्यानंतर १७,५२१ महिलांना विविध चार योजनेत पात्र करून समाविष्ट करण्यात आले.

दरम्यान, महापालिकेने योजनेच्या अनुदानात वाढ देखील केली असून लाभार्त्याना थेट लाभ मिळवून दिला आहे. अशा प्रकारे भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिला महापालिका म्हणून ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रशासनाने गणेशोत्सवात महिलांना आर्थिक मदत करून सणासुदीच्या काळात उत्साहाचे वातावरण केले असल्याने वंचित आणि गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला आहे.

कचरावेचक ४५ महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपये, असे सात लाख २० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या ३२४ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये असे दोन कोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

१५१८ विधवा महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे तीन कोटी ७९ लाख ५० हजार रुपये वाटप करण्यात आले.

६० वर्षीय १४,९५२ महिलांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये असे १७ कोटी ९४ लाख २४ हजार रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.