Thanevaibhav Online
22 September 2023
ठाणे: नुकत्याच मुंबई येथील सीसीआय येथे पार पडलेल्या भव्य अशा एमएमएसए आंतरशालेय अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील अंजना नायर हिने अंतिम फेरीच्या सामन्यापर्यंत प्रभुत्व कायम ठेवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
राऊंड ऑफ १२८ पासून ते राऊंड ऑफ 16 पर्यंत अंजनाने स्वतःच्या उत्तम खेळीने सर्वांवर मात करीत उप उपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीमध्ये अनविष घोरपडे या खेळाडूचा 21-15 असा पराभव करीत उपांत्य फेरीत आपली जागा सुनिश्चित केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात सियाना नरोना या विजेतेपदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या खेळाडूचा तिने 21-6, 21-7 असा सहज पराभव करून अंतिम फेरी धडक मारली.
अंतिम फेरीच्या सामन्यात तिने कास्टेलीन टीएन या खेळाडूचा 21-16 आणि 23-21 असा पराभव करून आंतरशालेय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा सन्मान प्राप्त केला.
आपल्या या ज्युनियर खेळाडूच्या चमकदार कामगिरीने बॅडमिंटन अकॅडमीचे कोच अमित गोडबोले, फुलचंद पासी जीत शिरोडकर आणि एकेंद्र दर्जी या सर्वांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर व विघ्नेश देवळेकर तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.