Thanevaibhav Online
18 September 2023
मीरा-भाईंदरचा पाण्याचा प्रश्न सुटणार
भाईंदर: सन २०११ मध्ये घोषणा केलेल्या सुमारे १२०० कोटी खर्चाच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेला तब्बल आता गती प्राप्त झाली आहे. मीरा-भाईंदरच्या १६ लाख नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
सूर्या प्रादेशिक जलवाहिनी प्रकल्पांतर्गत तुंगारेश्वर अभयारण्याखाली हा बोगदा खोदण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत विक्रमगड तालुक्यातील सूर्या धरणामधील पाणी धरणाच्या खालील बाजूस असलेल्या कवडास उदंचन केंद्रामार्फत वेती गावाजवळील सूर्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. तेथून हे पाणी प्रक्रियेनंतर भूमिगत जल वाहिनीद्वारे गुरुत्वाकर्षण पद्धतीने आधी वसई-विरार व त्यानंतर मिरा- भाईंदर महापालिकेच्या वितरण केंद्रात आणले जाईल. ही भूमिगत जलवाहिनी तुंगारेश्वर अभयारण्यातून जाणार असल्याने वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी तेथे विशेष बोगदा खणला गेला आहे.
मनोरजवळील मेंढवण खिंड येथेदेखील १.७० किमी लांबीचा बोगदा खोदण्यात आला आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामध्ये एकूण चार बोगद्यांचा समावेश आहे. त्यातील एक बोगदा पहिल्या टप्प्यात आणि इतर तीन बोगदे दुसऱ्या टप्प्यात आहेत. मेंढवण खिंड येथील बोगदा पहिल्या टप्प्यातील होता आणि तो आता पाणीपुरवठ्यासाठी तयार आहे.
अन्य तीन बोगदे तुंगारेश्वर अभयारण्याखालील आहेत. हे बोगदे ४.६ किमी लांबी व २.८५ मीटर व्यासाचे आहेत. या पथकाला मेढवण खिंड येथील बोगद्याच्या कामाचा अनुभव असल्याने, तुंगारेश्वर बोगद्याचे काम हे ३० टक्के अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करण्यात आले. या बोगद्याच्या कामासाठी विस्तृत भू-तांत्रिक अभ्यास करण्यात आला. या भागातील भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती घेण्यासाठी बोअरहोलचे खोदकाम जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे २०० मीटर खोलीवर करण्यात आले. कणखर खडकांमध्ये भुयारीकरण करणे हे मोठे आव्हान होते. काही ठिकाणी डोंगरांची उंची सुमारे १९२ मीटर असल्याने त्या खालून भूयारीकरण करताना परिस्थिती आव्हानात्मक होती. यासाठीच जमिनीखालून ५५ मीटर खोलीवर हे काम करण्यात आले होते.
या योजनेतील कवडास येथील उदंचन केंद्राची क्षमता ४३२ दशलक्ष लिटर प्रति दिवस इतकी आहे. तेथून हे पाणी ४१८ दशलक्ष लिटर प्रति दिवस क्षमतेच्या सूर्यानगर (वेती गाव) जलशुद्धीकरण केंद्रात येईल. या केंद्रामधून हे पाणी वसई-विरार आणि मीरा-भाईंदरपर्यंत आणण्यासाठी ८०.७१ किमी जलवाहिन्यांचे जाळे टाकले जात आहे. या प्रकल्पातून वसई-विरार महापालिकेला दररोज १८५ दशलक्ष लिटर, तर मिरा-भाईंदर महापालिकेला २१८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. भूमिगत जलवाहिनीद्वारे वसई-विरार शहरातील काशिद कोपर आणि मीरा-भाईदर शहरातील चेने येथील जलाशयास घाऊक प्रमाणात या पाण्याचा पुरवठा होईल. त्यांची क्षमता अनुक्रमे ३८ व ४५ दशलक्ष लिटर प्रति दिन आहे.