गणपती, पर्युषण आणि आपण

हिंदू धर्मातील गणेशोत्सव आणि जैन बांधवांतर्फे पाळले जाणारे पर्युषण पर्व या दोन्ही घटना दरवर्षी भाद्रपदात येत असल्यामुळे त्याबद्दल अनेकांच्या मनात कुतुहल असणे स्वाभाविक आहे. पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. पर्युषण या शब्दाचा अर्थ असा मानला जातो की मानवाला ग्रासणारे षड्रिपू अर्थात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हव्यास आदी विकारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनाची शांती साध्य करण्यासाठी या पर्वाची योजना आहे. तसे पाहिले गेले तर भारतीय संस्कृतीमधील सर्व धर्मांमधील सण, व्रत-वैकल्य, रीतीरिवाज यांना सामाजिक आणि प्रबोधनात्मक अधिष्ठान असते, हे नाकारुन चालणार आहे. केवळ उत्साह आणि आनंदाचा आविष्कार या सणांच्या साजरीकरणामागचा हेतू नसून आंतरिक स्वच्छता, अवगुणांचे निर्मूलन, आत्मपरीक्षणाची संधी, नवसंकल्पांची सुरुवात, अशा सर्व सकारात्मक बाबींचा समावेशही सणवारांमध्ये आणि त्यांच्या साजरीकरणाच्या पद्धतीत सामावला आहे. धार्मिक अधिष्ठान तर असतेच पण त्याहीपेक्षा सहिष्णुता, सहकार्य, सौहार्द, समन्वय, सुसंवाद, सद्गुणांचा मान आदी गुणांना चालना देऊन मानवजन्माचे व्यापक हीत कसे अबाधित राहील यांचे उदात्त संस्कार आपल्या सणांमध्ये आढळतात. पर्युषण असो की गणेशोत्सव हे वार्षिक सण मोठ्या भक्तीभावाने साजरे करताना त्यांच्यामुळे होणार्‍या या आंतरिक फायद्यांचा साकल्याने विचार करावा लागेल.
ठाण्यात जैन समाजाचा प्रभाव आहे. पिढीजात व्यापारीवर्ग असणारा हा समाज आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक कार्यातही पुढे असतो. महावीरांच्या उदात्त विचारांचा पगडा असलेल्या या समाजाचे बांधव अहिंसेचे अनुयायी असतात. त्यांचे आचरण हे सहसा उपद्रवी नसते. शेकडो वर्षांपूर्वी देशातील विविध प्रांतात जाऊन स्थायिक झालेला हा समाज स्वत:चे अस्तित्व आणि सत्व टिकवून त्या-त्या समाजाशी एकरुप झाला. संघर्ष हाच मुळी अमान्य असलेल्या या समाजाला त्यामुळे मान्यता मिळत गेली. अर्थात जसे सर्व समाजात काही अपवाद असतात तसे उपद्रवी मूल्य असणाऱ्या व्यक्ती या समाजातही आहेत. सात्विकतेच्या बुरख्याखाली अनैतिकता दडली असते.प्रसंगी सामुहिक जीवनासाठी दाखवावी लागणारी सहिष्णुता दिसत नाही. खानपानाच्या सवईवरून टोकाची भूमिका घेतली गेल्याची उदाहरणे कमी नाहीत. अर्थात असे प्रकार अत्यल्प असून ते अन्य धर्मीयातही आढळतात. एकूणातच जैन समाजाप्रमाणे अन्य धर्मीयातही पर्युषणाचा विचार व्हायला हरकत नाही.अर्थात धर्माबद्दल अभिमान बाळगताना दुराग्रह होणार नाही याची काळजी घेणे हे परिपक्वतेचे लक्षण ठरू शकेल. अशा या समाजाच्या या संवत्सर सणाचे महत्त्व हळूहळू अवघ्या समाजाला समजू लागले आहे आणि माणुसकी या धर्मावर विश्वास वाढावा या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे.सध्या शहरांमध्ये ठिकठिकाणी बाप्पाचे स्वागत करणारे जसे फलक लागले आहेत तसे ‘मिच्छा मी दुक्कडं’ ही ओळ ठळकपणे नजरेस पडत आहे. हे आठ दिवसांचे पर्व जैन तीर्थंकरांनी सत्य, अहिंसा आणि क्षमा या मूल्यांचे आचरण करण्यासाठी राखून ठेवले आहे. ‘मिच्छा मी दुक्कडं’ याचा लौकिकार्थ असा की कोणाच्या कळत, नकळत कोणाचे मन माझ्याकडून दुखावले गेले असेल काही अपशब्द बोलला गेला असेल एखादी टाळता येणारी कृतीही झाली असेल आणि त्यामुळे समोरच्याला यातना पोहोचल्या असतील तर आम्हाला माफ करा असा संदेश या तीन शब्दांतून अभिप्रेत असतो.
व्हॉट्सअ‍ॅपमुळे हे तीन शब्द असलेले संदेश जैन बांधवांप्रमाणे बिगर जैन बांधवही आपल्या आप्त-स्वकीयांना पाठवत असतात. समाज माध्यमांमुळे समाज दुभंगला जात असल्याची ओरड एकीकडे सुरु असताना अशा संदेशांच्या देवाणघेवाणीतून सामंजस्याचे सेतूही बांधले जाऊ शकतात हे सिद्ध होते.
जैन धर्मातील ही महत्त्वाची शिकवण त्या धर्माच्या बाहेरील नागरिकांना पाळायला हरकत नाही. हे वर्ष निवडणुकीचे आहे आणि त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होतील. राजकारणासाठी हे ‘पर्व’ अत्यंत संवेदनशील असते आणि त्यामुळे पर्युषण पाळले गेले तर त्यात सर्वांचेच भले होऊ शकेल. गेल्या काही वर्षात आपण पहात आहोत की संयम आणि सहिष्णुतेची जागा संताप आणि स्वैराचाराने घेतली आहे. सार्वजनिक जीवनात पाळायची पथ्ये तर विस्मरणातच गेली आहेत आणि अत्यंत हीन स्वरुपाचे विचार, कट-कारस्थाने, राक्षसी महत्वाकांक्षा यांनी सार्वजनिक जीवन व्यापून गेले आहे. एकमेकांची मने दुखावण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कोणालाच त्याचे दु:ख अथवा पश्चाताप होत नाही, हे विदारक आहे. अशावेळी प्रत्येकाने आपल्या आत डोकावून पहाण्याची, तो आंतरिक आवाज ऐकण्याची आणि आत्मपरीक्षण करुन योग्य आणि नैतिक मार्गावरुन मार्गक्रमण करण्याची मानसिकता जोपासायला हवी. बाप्पाने त्यासाठी सर्वांना बुद्धी द्यावी हेच मागणे! गणपती बाप्पा, मोरया असा उद्घोष करताना ‘मिच्छा मी दुक्कडं’ असेही म्हणू या. कसे?