ओवळी रेल्वे उड्डाणपुलासाठी भूमिपूजन ६० कोटींचा खर्च

मार्चपर्यंत पूल पूर्ण करणार

भिवंडी: दिवा-वसई रोड रेल्वेमार्गावरील ओवळी-कामतघर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.

या पुलामुळे रेल्वे फाटकात दररोज होणारा १५ ते २० मिनिटांचा नागरिकांचा खोळंबा टळणार आहे. या पुलासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, येत्या मार्चपर्यंत पूलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

देशभरातील २२०० हून अधिक रेल्वे गेटच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यानुसार ओवळी येथे रेल्वेमार्गावरील पुलाला मंजुरी मिळाली. या पुलाच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. या पुलाची अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून मागणी केली जात होती. त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या फाटकाच्या ठिकाणी पूल उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले. या पुलाच्या ६० कोटींपैकी केंद्र व राज्य सरकारकडून पुलासाठी प्रत्येकी ५० टक्के निधी दिला जाणार आहे. येत्या मार्चपर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बहुमजली विभागाकडून पुलाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पुलामुळे ओवळी-कामतघर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक सुमित पाटील, माजी नगरसेवक निलेश चौधरी, ओवळीच्या सरपंच सपना यतीश म्हात्रे, माजी सरपंच मनीष पाटील यांची उपस्थिती होती.