यंदा दीड लाख बाप्पांची होणार प्राण प्रतिष्ठापना

Thanevaibhav Online

14 September 2023

ठाणे: ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात या वर्षी दीड लाख बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत तर सुमारे १५ हजार गौरी स्थापित होणार आहेत.

ठाणे शहरात सार्वजनिक १०५२ गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे तर घरगुती एक लाख ४५,१९८ श्री मूर्ती भक्तांचा पाहुणचार घेणार आहेत. परिमंडळ १ ठाणे शहर येथे सार्वजनिक १३३ तर घरगुती १४,९९७ बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामध्ये दीड दिवसांच्या बाप्पांची संख्या ३८८० इतकी आहे. पाच दिवसांचे सार्वजनिक २५ तर घरगुती ५६५० इतके आहेत. गौरी १७२३ आहेत. सात दिवसांचे नऊ सार्वजनिक तर ९६० घरगुती गणपती आहेत. दहा दिवसांच्या गणपतीची संख्या सार्वजनिक ९८ तर घरगुती ४३९२ आहे.

परिमंडळ ५ वागळे इस्टेट येथे सार्वजनिक २०५ आणि घरगुती २६,८५९ बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामध्ये दीड दिवसांचे ११ सार्वजनिक आणि घरगुती ८,५७७ बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. पाच दिवसांचे ३२ गणपती सार्वजनिक आणि ९,४८९ घरगुती गणपतींचा समावेश आहे. सात दिवसांचे सार्वजनिक १५ आणि घरगुती १७०१ तर दहा दिवसांचे सार्वजनिक १४७ आणि घरगुती ७०६३ घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.

परिमंडळ २ भिवंडी येथे सार्वजनिक १५३ तर घरगुती १०,६६२ गणेशोत्सव साजरे केले जाणार आहेत. ५७३ गौरीचे आगमन होणार आहे. परिमंडळ ३ कल्याण येथे सार्वजनिक २९४ तर घरगुती ४७,१२९ गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. परिमंडळ ४ उल्हासनगर येथे घरगुती ४५,६५१ गणरायांचे आगमन होणार आहे. २६७ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जाणार आहेत.

पुढील आठवड्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याने आत्तापासूनच मंडळांचे कार्यकर्ते आकर्षक सजावट करण्यात गुंतले आहेत तर पोलिस प्रशासन देखिल चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी आराखडा तयार करत आहेत.