नागरिकांच्या आरोग्यास धोका, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेने गेल्या २० वर्षात नागरिकांसाठी भाजी मार्केट बांधून सुरू केले नाही. तर भाजी मार्केटसाठी आरक्षित जागेवर कचरा संकलनाच्या नावे डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातून दररोज ४५० ते ५०० टन कचरा तयार होत आहे. तो घराघरातून आणि सर्व व्यावसायिक आस्थापनातून कचरा जमा करणे तसेच शहरातील जागोजागी साचलेला कचरा जमा करण्याबाबतचा ठराव मनपा प्रशासन आणि नगरसेवकांनी घेऊन तो ठेका आर अँड बी इन्फ्रा कंपनी, बोरिवली या कंपनीस दिला आहे. हा ठेका सहा वर्षांसाठी दिला आहे.
ठेकेदाराचे कर्मचारी शिवाजीनगर खडक रोड येथे संकलनासाठी जमा करून तो कचरा ठेकेदाराने दररोज मोठ्या गाडीने चावींद्रा येथील डम्पिंग ग्राउंड येथे नेऊन टाकला पाहिजे. परंतु ठेकेदाराने हा कचरा अनेक दिवस खडकरोड येथील भाजी मार्केटसाठी आरक्षित जागेत साठवून ठेवल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या जागेत कचरा साचवून ठेवल्याने पावसाच्या पाण्याने कुजून दुर्गंधी पसरली आहे.
शिवाजीनगर, ठाणगेआळी, खडक आणि निजामपूर परिसर, कासारआळी या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. दुर्गंधीमुळे परिसरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.
साईड नं. ५६ ही जागा पालिकेने नवीन मार्केटची इमारत बांधण्यासाठी राखून ठेवली आहे. सध्या पालिकेकडे इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने इमारत बांधण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती शहर अभियंता सुनील घुगे यांनी दिली.
भिवंडी महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड शहरातील लोकवस्तीपेक्षा दूर आहे. त्यामुळे छोट्या घंटागाड्यांमधून जमा केलेला कचरा संकलन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी संकलन केंद्रे बनविली आहेत. तेथे जमा केलेला कचरा चावींद्रा येथे घेऊन जाण्याचे काम ठेकेदाराचे आहे. संकलन केंद्राप्रमाणे खडक येथील कचरा साठवून न ठेवता दररोज चवींद्रा डम्पिंग येथे नेऊन टाकण्याचे आदेश कचरा ठेकेदारास दिले आहेत, असे सार्वजनिक आरोग्य अधिकारी जयवंत सोनवणे यांनी सांगितले.