६७५ कोटींची तरतूद; ३२७८ रुग्णांची क्षमता
ठाणे : मनोरुग्णालयाच्या काही जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक होत असतानाच उर्वरित जागेत आगामी काळात ६७५ कोटी खर्चून ३२७८ रुग्णांच्या क्षमतेचे अद्ययावत रुग्णालय उभे राहणार आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त हे रुग्णालय देशातील सर्वात मोठे रुग्णालय असणार आहे.
बंगळूर येथील प्रसिद्ध ‘ नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस)/ एनआयएमएचएएनएस’च्या धर्तीवर मनोरुग्णालयाची बांधणी केली जाणार आहे. रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्रात स्वच्छ वातावरण असेल.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मनोरुग्णालयाला ऐतिहासिक महत्व आहे. सन १९०१ मध्ये उभारलेल्या या रुग्णालयामध्ये 100 वर्षांहून अधिक जुन्या वास्तू पाहण्यास मिळतात. सुमारे ७२ एकर जागेत रुग्णालय वसले असून १८५० खाटांची क्षमता आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्राची तरतूद यामध्ये असणार आहे. मनोरुग्णांसाठी सुसज्ज इमारत, पुनर्वसन केंद्र, बाह्य विभाग, लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, व्यवसाय उपचार विभाग, इसीटी, कर्मचारी, अधिका-यांकरीता निवाशस्थान, भव्य ऑडीटोरियम, मेंदू आजारांसाठी अत्याधुनिक वॉर्ड आदींचा नियोजित भव्य वास्तूत समावेश असेल.
तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्म-चा-यांच्या निवासाकरीता दोन १२ मजली इमारती असतील. शिवाय ‘न्यूरो सायकॅट्रिक सर्जरी अँड ट्रिटमेंट’साठी अद्ययावत कक्ष आणि लहान मुलांसाठी बाह्य विभागाकरीता स्वतंत्र कक्षाची तरतूद केल्याची माहिती मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.
मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी सुमारे १४.८३ एकर जागा नवीन रेल्वे स्थानक उभारणीसाठी आणि ठाणे महापालिकेच्या विस्तार प्रकल्पाकरीताच द्यावी, असे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे विद्यमान रुग्णालयाचे क्षेत्रफळ कमी होणार आहे. परंतु, मनोरुग्णालयाची पुढील नवीन बांधणी आधुनिक असल्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना होईल, असा विश्वास आरोग्य प्रशासनाला आहे, असेही डॉ. मुळीक म्हणाले.